कामठी : अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यास कामठी (नवीन) पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून शस्त्र व चारचाकी वाहन असा एकूण ३ लाख ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २१) रात्री कामठी शहरात करण्यात आली.
आशिष ऊर्फ मोनू मनपिया (२७, रा. कन्हान, ता. पारशिवनी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. आशिषकडे शस्त्र असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे कामठी (नवीन) पाेलिसांच्या पथकाने एम.एच.-३१/इक्यू-०८२३ क्रमांकाच्या कारने कन्हानहून कामठी शहरातील जयस्तंभ चाैक मार्गे शहरात येणाऱ्या आशिषला मध्येच अडविले आणि त्याची झडती घेतली.
त्याच्याकडे १३ इंच लांबीचे धातूचे धारदार शस्त्र आढळून आले. ताे हे शस्त्र गुन्हा घडवून आणण्यासाठी बाळगत असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कार व शस्त्र ताब्यात घेतले. या कारवाईत त्याच्याकडून ३ लाख रुपयांची कार आणि ३०० रुपयांचे शस्त्र असा एकूण ३ लाख ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून, ताे सराईत गुन्हेगार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.