जाती धर्माच्या नावावर भांडणे आमची संस्कृती नव्हे : माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:26 IST2019-11-20T22:22:40+5:302019-11-20T22:26:23+5:30
नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.

डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २०१९ प्रदान करताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कृष्णा इन्स्टिट्यूटऑफ मेडिकल सायंसेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी, आमदार गिरीश व्यास आणि इतर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांनी नेहमीच एकतेचा संदेश दिला आहे. नागपूरकर नेहमीच जाती पातीच्या पलिकडे जाऊन कार्य करतात. जातीधर्माच्या नावावर भांडणे ही आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केले.
मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार २०१९ राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शंकरनगरच्या श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मारवाडी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी, पुनमचंद मालू, अतुल कोटेचा, विजय दमानी, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते. विकास सिरपूरकर म्हणाले, प्रबोधनाला आपले जीवन मानणाऱ्या मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांना प्रबोधनाचा पुरस्कार देण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांनी केलेले समाज प्रबोधनाचे कार्य अलौकिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार मिळाला नसता तर प्रबोधनासोबत न्याय झाला नसता. कथाकार, प्रवचनकार होणे सोपे आहे, परंतु प्रबोधनकार होणे अवघड आहे. समाजाला एकजूट ठेऊन वैचारिक उत्थानासाठी प्रवचन, कथेने चालत नाही तर प्रबोधनाची गरज भासते. प्रबोधन हे समाजाचे धन असून समाजातील करंट्या मानसिकतेला उद्बोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना मो. शरफुद्दीन साहिल म्हणाले, हा मुस्लीम समाजाचा सत्कार असून यामुळे देशात राष्ट्रीयता संपणार नसल्याचा संदेश मिळतो. भगवद्गीता, रामायण, बायबल आणि कुराणात ईश्वर एक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु आपण जातीधर्माच्या नावावर भांडतो. आपल्यात भांडणे लावून इंग्रज निघून गेले. समाज जातीधर्माच्या नावावर विखुरल्या जात आहे. धर्म, सत्तेच्या नावावर भांडणे वाढली आहेत. त्यामुळे कबीर, ज्ञानेश्वर, सुफी, संतांनी दिलेल्या एकतेच्या संदेशावर वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकातून गिरीश गांधी यांनी साहिल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मोहम्मद असदुल्ला यांनी डॉ. मोहम्मद शरफुद्दीन साहिल यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी शाल, श्रीफळ आणि एक लाखाचा धनादेश देऊन मो. शरफुद्दीन साहिल यांना पुरस्कार प्रदान केला. संचालन सुधीर बाहेती यांनी केले. आभार अतुल कोटेचा यांनी मानले.