आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास निष्कर्षहीनच; 'सीबीआय'ची हायकोर्टात माहिती
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: September 19, 2023 18:46 IST2023-09-19T18:46:20+5:302023-09-19T18:46:36+5:30
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास सात वर्षानंतरही निष्कर्षहीनच आहे.

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास निष्कर्षहीनच; 'सीबीआय'ची हायकोर्टात माहिती
नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास सात वर्षानंतरही निष्कर्षहीनच आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांना आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध होतील, अशी ठोस 'लिंक' अद्याप सापडली नाही. त्यामुळे सीबीआय यासंदर्भात सक्षम न्यायालयात अहवाल दाखल करण्याच्या तयारीत आहे.
'सीबीआय'ने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वाल्मिकी मेनेझेस यांनी ही माहिती रेकॉर्डवर घेऊन याविषयी आवश्यक आदेश देण्याकरिता येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण व्हावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, याकरिता एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याशिवाय, 'सीबीआय'ने या हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी न्यायालयाला केली आहे.
२०१६ मध्ये घडली घटना
ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदूकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.