Arbitrary traffic police, made false chalan | वाहतूक पोलिसांची मनमानी, बनविले खोटे चालान

वाहतूक पोलिसांची मनमानी, बनविले खोटे चालान

ठळक मुद्देदोन ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून बोगस चालान बनविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गिट्टीखदान, काटोल रोडवरील वाहतूक कर्मचारी वाहनचालकांना थांबवून जाणीवपूर्वक वेगवेगळ्या कारणावरून चालान कारवाई करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्हायला लागला आहे. अशाच एका प्रकरणात एका दुचाकीस्वाराकडून ५०० रुपयाचे चालान कापले. त्यासाठी दोन लायसन्स दाखविल्याचा आरोप पोलिसांनी लावल्याची तक्रार आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारकर्ता उत्कर्ष फुले २९ मार्चच्या सायंकाळी आपला मित्र कुशल चिमणकर याच्या एमएच/३१/डीटी /००४८ क्रमांकाच्या बाईकवरून घरी परत येत होता. यादरम्यान त्याने मास्क लावला होता, हेल्मेटही होते. तरीही सदर परिमंडळाचे एपीआय सतीश गोडसे यांनी दोघांनाही थांबवून डबलसीट असल्याने चालानची कारवाई करीत असल्याची माहिती दिली. यावर उत्कर्षने सध्या डबलसीटवर कोणतेही बंधन नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी महाराष्ट्र मोटर व्हेईकल्स ॲक्टच्या कलम ६ (१) व १७९ नुसार त्याच्याकडे एकाच नावाचे दोन वाहतूक परवाने असल्याचे कारण दर्शवीत ५०० रुपयाचे चालान फाडले. १५ दिवसात दंड न भरल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली.

उत्कर्षच्या मते, त्याच्याकडे एकच परवाना आहे. त्याने आपल्या वकिलांमार्फत ३ एप्रिलला एपीआय गोडसे यांच्यावर नोटीस बजावला. यानंतर ही कारवाई चुकीने झाली असे सांगत जुने चालान रद्द करून नव्याने चालान बनविण्याचे व स्वत: ५०० रुपयाचा दंड भरणार, असे आश्वासन दिले. याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त (शहर) सारंग आव्हाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही.

नागरिकांनी चालान तपासून घ्यावे

ॲड. कौस्तुभ फुले म्हणाले, वाहनचालकांची चूक नसतानाही वाहतूक पोलीस खोटे आरोपलावून कारवाई करतात.त्यामुळेअसे चालान फाडल्यावर वाहनचालकांनी ते कशासंदर्भात आहे, हे तपासून घ्यावे. नंतरच दंड भरावा.

Web Title: Arbitrary traffic police, made false chalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.