एप्रिलमध्येच जलसाठ्यात घट
By Admin | Updated: April 4, 2016 05:44 IST2016-04-04T05:44:09+5:302016-04-04T05:44:09+5:30
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाबरोबरच विदर्भातील

एप्रिलमध्येच जलसाठ्यात घट
नागपूर : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाबरोबरच विदर्भातील सिंचन प्रकल्प कोरडे पडायला लागली आहेत. गेल्या वर्षी सरासरीच्या ३० टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. सध्या नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पात ३२ टक्के, मध्यम प्रकल्पात १७ टक्के व लघु प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार, अशी शक्यता आहे.
विदभार्तील पाणीपुरवठ्याची भिस्त बऱ्याच प्रमाणात सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळेच उन्हाळा लागताच प्रशासनासह नागरिकांची नजर प्रकल्पातील पाणीसाठ्यावर असते. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस कमी झाल्याने त्याचा प्रकल्पातील पाणीसाठ्यावर परिणाम होणार असल्याचे संकेत आधीपासूनच दिले जात होते. एप्रिल महिन्याला सुरुवात होत असतानाच तो अंदाज काहीसा खरादेखील ठरल्याचा दिसतो आहे.
नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पात ३२ टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के व लघु प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा आहे. सध्या प्रकल्पात असलेल्या पाणीसाठ्याची गेल्या वर्षीच्या साठ्याशी तुलना केल्यास ती निश्चितच काळजी वाढविणारी आहे. गेल्या वर्षी नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पात ३५ टक्के व मध्यम प्रकल्पात १५ टक्के व लघु प्रकल्पात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. हवामान विभागाने यंदा एप्रिल व मे महिन्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याचा पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.(प्रतिनिधी)
अद्याप तरी
टंचाईची स्थिती नाही
४सध्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा समाधानकारक आहे. पाणीटंचाईसदृश परिस्थिती असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीटंचाईची स्थिती पाहून प्रकल्पांमधील पाणीसाठा राखीव ठेवण्याचे पत्र प्राप्त होते. अद्याप तरी असे पत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे सध्या तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नसल्याचे सिंचन विभागाचे मत आहे.