लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाचे ११,१६९ कोटी रुपयांच्या खर्चाचे चार प्रकल्प मंजूर केले. विशेष म्हणजे, यातील दोन प्रकल्प महाराष्ट्रात असून, त्यातील एक नागपूर-इटारसी चाैथ्या रेल्वेलाइनचा आणि दुसरा संभाजीनगर परभणी दुसऱ्या लाइनचा आहे.
या चार प्रकल्पामुळे रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये ५७४ किलोमीटरचा वाढ होणार आहे. या बहुट्रॅकिंग प्रकल्पामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड अशा सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांमध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या "गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन"अंतर्गत नियोजन करण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे नमूद राज्यातील २,३०९ गावांतील ४३.६० लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. प्रवासी आणि माल वाहतुकीच्या दृष्टीने येणारे अडथळे दूर होणार असून, सुलभ, जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासही त्यांची मदत होणार आहे.
रोजगार, व्यापार, उद्योगाला लाभइटारसी-नागपूर फोर्थ लाइन आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) - परभणी सेकंड लाइनमुळे एकीकडे रेल्वेची प्रवासी तसेच मालवाहतूक सुसाट होणार असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्या-त्या भागातील व्यापार तसेच स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेच्या दिशेने एक ठोस पाऊल पडण्याचेही संकेत या प्रकल्पामुळे आहे.
हे आहेत ते चार प्रकल्प
- इटारसी-नागपूर चौथी रेल्वेमार्ग
- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)- परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरण
- आलुवा बारी रोड-न्यू जलपाईगुडी तिसरी व चौथी मार्गिका
- डांगोआपोसी-जारोली तिसरी व चौथी मार्गिका