सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा
By Admin | Updated: August 18, 2016 02:15 IST2016-08-18T02:15:46+5:302016-08-18T02:15:46+5:30
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, भत्ते, सेवा सवलती देण्यात याव्यात,

सातवा वेतन आयोग त्वरित लागू करा
एसटी कर्मचाऱ्यांची मागणी : महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे आंदोलन
नागपूर : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी, भत्ते, सेवा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसच्यावतीने विभाग नियंत्रक कार्यालय आणि हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेसमोर निदर्शने करण्यात आली.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे आमदार जयप्रकाश छाजेड यांनी राज्यव्यापी संपर्क यात्रा काढून कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १७ आणि १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच आश्वासन दिले होते.
परंतु या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे पुन्हा संपावर जाण्याआधी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने हे धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात १ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, चालक वाहकांच्या ड्युटी अलोकेशन संगणकीकृत करून टी ९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी, विनंती बदल्या त्वरित कराव्या, महिला कर्मचाऱ्यांना सोयी-सवलती, ठरलेल्या वेळेत काम द्यावे, कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी दोन वर्षे करावा, कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशांप्रमाणे १० लाख रुपये आणि पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, लांब पल्ल्याची बंद करण्यात आलेली नियते सुरू करावी आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. विभाग नियंत्रक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे नेते लक्ष्मण घुमरे, प्रादेशिक सचिव शैलेश भारती, महासचिव अरुण भागवत, अध्यक्ष नंदू वैष्णव, कार्याध्यक्ष विजय शेंडे उपस्थित होते तर हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व महासचिव सुभाष गोजे, मोरेश्वर कुमेरिया, वसंत वैद्य यांनी केले. (प्रतिनिधी)