मनपा आयुक्तांची हायकोर्टात हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST2021-01-08T04:21:19+5:302021-01-08T04:21:19+5:30
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईल व कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनाकरिता विशेष नियम तयार करण्यात आले नसल्यामुळे ...

मनपा आयुक्तांची हायकोर्टात हजेरी
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड-१ हेरिटेज झिरो माईल व कस्तुरचंद पार्कच्या संवर्धनाकरिता विशेष नियम तयार करण्यात आले नसल्यामुळे बजावण्यात आलेल्या समन्सनुसार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजेरी लावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची हजेरी रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर सविस्तर सुनावणी घेण्यासाठी १३ जानेवारी ही तारीख दिली. तसेच, त्या दिवशी मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याने आवश्यक माहितीसह हजर राहावे, असे सांगितले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १५ ऑक्टोबर २००३ रोजी लागू हेरिटेज इमारत संवर्धन नियमातील नियम ४.१ अनुसार ग्रेड-१ हेरिटेजकरिता विशेष नियम तयार करणे आवश्यक आहे. परंतु, नागपुरात २००३ पासून येऊन गेलेल्या एकाही महानगरपालिका आयुक्तांनी ग्रेड-१ हेरिटेजकरिता विशेष नियम तयार केले नाहीत. त्यामुळे ग्रेड-१ हेरिटेज त्यांचा गौरव हरवत आहेत. उच्च न्यायालयाचा दणका बसल्यानंतर नियम तयार करण्याकरिता तीन सदस्यीय उपसमिती स्थापन करण्यात आली आहे; परंतु, समितीचे कामकाज संथगतीने सुरू आहे.