एपीजे...अ मॅन आॅफ प्रिन्सिपल्स

By Admin | Updated: July 28, 2015 03:35 IST2015-07-28T03:35:54+5:302015-07-28T03:35:54+5:30

ज्ञान ही त्यांची साधना होती अन् विद्यार्थी त्यांच्या विचारांचे साधक. मिळालेले काही ठेवू नये, सतत देतच राहावे हा जीवनाचा

APJ ... A Man of Principles | एपीजे...अ मॅन आॅफ प्रिन्सिपल्स

एपीजे...अ मॅन आॅफ प्रिन्सिपल्स

योगेश पांडे ल्ल नागपूर
ज्ञान ही त्यांची साधना होती अन् विद्यार्थी त्यांच्या विचारांचे साधक. मिळालेले काही ठेवू नये, सतत देतच राहावे हा जीवनाचा मंत्र असल्याने मुक्तहस्ते ज्ञान वाटायचे. ना कसला गर्व, ना कुठला मोठेपणा. शाळकरी विद्यार्थी असो, संशोधन करणारे प्राध्यापक किंवा अगदी साठी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक. प्रत्येकासाठी त्यांच्याजवळ मौलिक विचार होते. उपराजधानीत ते अनेकदा आले, मार्गदर्शन केले अन् प्रत्येक वेळी एकच दृश्य दिसले. ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’!

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून आत्मविश्वासाचे अन् स्वप्नांचे ‘विंग्ज’ दिले अन् त्यांच्यात काही तरी वेगळे करून दाखविण्याची ‘फायर’ जागविली. विशेष म्हणजे आयुष्यात यश मिळविण्यासोबतच आपल्या तत्त्वांवर चालणेदेखील तितकेच आवश्यक असते हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले होते. ‘एपीजे’ अचानक सर्वांमधून निघून गेले असले तरी विचाररूपाने ते उपराजधानीतील लक्षावधी हृदयांमध्ये अमर झाले.

मी कशासाठी आठवणीत राहील?
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी कलाम यांनी ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांवर ज्ञानवर्षाव केला होता. कलाम यांचा विद्यार्थ्यांना सवाल होता, ‘मी कशासाठी आठवणीत राहील?’ यातील ‘मी’ हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी होता. काम प्रत्येक जणच करतो, प्रामाणिकपणे प्रयत्नदेखील अनेकजण करतात. परंतु एखादे काम करताना पूर्णपणे झोकून दिले तरच त्यातून चिरकाळ सोबत राहणारे समाधान मिळते, असे ते म्हणाले होते.

डॉ.कलामांनी मराठीत दिलेल्या शुभेच्छा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऐतिहासिक शंभराव्या दीक्षांत समारंभाला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणाला सुरुवात करण्याच्या वेळी डॉ. कलाम यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ‘नागपूर विद्यापीठातील सर्वच विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो,' असे चक्क मराठीत म्हणून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. मराठी भाषा मला आवडते व मी ती बोलण्याचा प्रयत्न करतो, असेदेखील त्यांनी सांगितले होते.

‘मंगळयान’ यशाचे ‘सेलिब्रेशन’
२६ सप्टेंबर २०१४ रोजी ‘व्हीएनआयटी’चा तांत्रिक महोत्सव ‘अ‍ॅक्सिस’ला डॉ.कलाम यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत ‘मंगळयान’ मोहिमेच्या यशाचे ‘सेलिब्रेशन’ केले होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी या विषयावर संवाद साधला होता व मार्गदर्शन केले होते. २४ सप्टेंबर रोजी ‘मंगळयान’ प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले व या क्षणाचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान वाटतो.यशाजे यश जगातील काही मोजक्या देशांनी मिळविले आहे, त्या पंक्तीत आता भारतदेखील समाविष्ट झाला आहे. ‘मंगळयान’ मोहिमेच्या सफलतेमुळे भारत ‘नंबर १’ झाला आहे. हे स्थान टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांचीच आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, हार मानू नका असे ते म्हणाले होते.

Web Title: APJ ... A Man of Principles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.