एपीजे अब्दुल कलाम हे आधुनिक ऋषीच
By Admin | Updated: August 9, 2015 02:45 IST2015-08-09T02:45:05+5:302015-08-09T02:45:05+5:30
नित्य जीवनात ज्ञान साधना करणारे, प्रचंड विद्वान तरी कमालीचे विनम्र, सतत काहीतरी शिकणारे ...

एपीजे अब्दुल कलाम हे आधुनिक ऋषीच
सलाम टू कलाम : सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर : नित्य जीवनात ज्ञान साधना करणारे, प्रचंड विद्वान तरी कमालीचे विनम्र, सतत काहीतरी शिकणारे आणि आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी व्हावा, यासाठी सातत्याने झटणारे नवीन पिढीला मार्गदर्शन करणारे भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थाने आधुनिक ऋषी होते. त्यामुळे त्यांचे गुण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विज्ञान भारती आणि प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेट्री यांच्या संयुक्त विद्यमाने मुंडले सभागृह येथे ‘सलाम टू कलाम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, डॉ. शंकर तत्त्ववादी, व्हीएनआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, सुरेश शर्मा, डॉ. ए.के. क्रांती आणि संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. मोहन भागवत म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषिमुनी होऊन गेलेत. ते जंगलात राहायचे. ते प्रचंड ज्ञानी होते. सतत ज्ञानसाधना करायचे. नवीन पिढीला मार्गदर्शन करायचे, असे आपण ऐकले आहे. त्यांना आपण पाहिले नाही. परंतु हे सर्व गुण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यात ठासून भरले होते. सतत काहीतरी नवीन शिकण्याची त्यांची जिद्द होती. आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी केवळ आपल्यापुरता मर्यादित ठेवला नाही. तर त्यांनी ते ज्ञान नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य शेवटपर्यंत केले. आपण एखाद्या राष्ट्रपतीसोबत बसलो आहोत, असे वाटतच नव्हते. इतकी विनम्रता त्यांच्यात असल्याचेही त्यांनी सांगितली. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, डॉ. अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांनी भद्रावती येथील आॅर्डनन्स कंपनी स्थलांतरित होण्यापासून वाचवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. सतीश वटे, डॉ. शंकर तत्त्ववादी, भरतभूषण जोशी, मिथिलेश तिवारी यांनी डॉ. कलाम यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. श्रीराम ज्योतिषी यांनी तर संचालन डॉ. पराग निमिषे यांनी केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनीही वाहिली आदरांजली
हर्ष गोलाईत या नेत्रहीन बालकाने ब्रेल लिपीच्या साहाय्याने तर राजाकुमार झा याने कवितेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. क्षितिज महाजन व बिलवा खापर्डे या विद्यार्थ्यांनीही आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी विज्ञान भारतीच्या ‘क्या अग्निपंख थम गये?’ या स्मरणिकेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.