नागपुरातील अतिक्रमण कारवाईत ‘एपीआय’चे ‘मज्जावतंत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:42 IST2019-11-08T00:40:50+5:302019-11-08T00:42:18+5:30
माटे चौकाजवळ गुरुवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी नागपूर पोलिसांच्या एका ‘एपीआय’चे अजबच ‘मज्जावतंत्र’ पाहायला मिळाले. अतिक्रमण कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखण्यात आले व असभ्य वर्तन करण्यात आले.

नागपुरातील अतिक्रमण कारवाईत ‘एपीआय’चे ‘मज्जावतंत्र’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माटे चौकाजवळ गुरुवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी नागपूर पोलिसांच्या एका ‘एपीआय’चे अजबच ‘मज्जावतंत्र’ पाहायला मिळाले. अतिक्रमण कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखण्यात आले व असभ्य वर्तन करण्यात आले. तर नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवकाला तर अक्षरश: ओढत बाहेर काढण्यात आले.
दुपारच्या सुमारास कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहचले. तेथे गेल्यावर एका प्रतिनिधीला घटनास्थळावर जाण्यास ‘एपीआय’ शिवचरण पेठे यांनी मज्जाव केला. पत्रकार असल्याचे सांगितल्यावरदेखील ते ऐकण्यास तयार नव्हते व धक्काबुक्की करत तेथून दूर करण्यात आले. त्यानंतर कारवाईचे ‘व्हिडीओ’ काढण्यास मनाई केली व मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला येथे ‘व्हिडीओ’ आणि फोटो काढण्याचा अधिकार नाही, अशी पेठे यांची भाषा होती. यासंदर्भात कुठले पत्र किंवा लेखी निर्देश आहे का अशी विचारणा केली असता पेठे यांनी अरेरावीची भाषा वापरली. माझी कमिश्नर काय, जिथे हवी तिथे तक्रार करा. मी कुणाला घाबरत नाही, असे ते म्हणाले.
कारवाई सुरू होण्याअगोदर त्यांनी स्थानिक रहिवाशांनादेखील तेथून हाकलले. माजी नगरसेवक प्रसन्न बोरकर तेथे गेले असता त्यांना तर चक्क उचलून बाहेर काढण्यात आले. विद्यमान नगरसेवक प्रमोद तभाने यांनादेखील मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांच्या या अरेरावीच्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू होती. परंतु स्थानिक निवासी, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी असभ्य वर्तन करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.