सत्तापक्ष नेत्याशिवाय आज महापौरांचे पदग्रहण
By Admin | Updated: September 8, 2014 02:18 IST2014-09-08T02:18:57+5:302014-09-08T02:18:57+5:30
महापालिकेचे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार उद्या, सोमवारी महापालिकेत आयोजित एका सोहळ्यात पदग्रहण करतील. 1

सत्तापक्ष नेत्याशिवाय आज महापौरांचे पदग्रहण
नागपूर : महापालिकेचे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार उद्या, सोमवारी महापालिकेत आयोजित एका सोहळ्यात पदग्रहण करतील. मात्र, या पदग्रहणाला सत्तापक्ष नेत्याची खुर्ची रिकामी असणार आहे. दटके महापौर झाल्यानंतर त्यांच्या जागी सत्तापक्ष नेते म्हणून अद्याप कुणाचीही नियुक्ती भाजपने केलेली नाही. या पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून या मुद्यावर महापालिकेतील भाजप दोन गटात विभागल्या गेली आहे.
महापौर निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. तीत सत्तापक्ष नेते पदावर चर्चा झाली पण निर्णय गडकरी- फडणवीस घेतील, असे ठरले होते. महापौर निवडीसाठी बोलाविलेल्या सभेतच सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी या पदासाठी कुठाही वाद नसून लवकरच नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता तीन दिवस उलटूनही निवड झाली नसल्याने पक्षात या मुद्यावर घमासान सुरू असल्याचे स्पष्ट होते.
महापालिकेत विकास ठाकरे यांच्यासारखा आक्रमक विरोधी पक्षनेता आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल गुडधे यांच्यासारखा अभ्यासु व खिंडीत पकडणारा नगरसेवक आहे. या दोन्ही नेत्यांना युक्तिवाद करून थोपविण्याचे काम सत्तापक्ष नेता म्हणून प्रवीण दटके यांनी कुशलतेने पार पाडले.
त्यामुळे दटके यांच्या जागी सत्तापक्ष नेता म्हणून विरोधी पक्षाचे आव्हान पेलणारा आक्रमक नेता असणे गरजेचे आहे. ही बाब भाजपचे बहुतांश नरसेवक खासगीत मान्यही करीत आहेत. मात्र उघडपणे बोलायला कुणी तयार नाही. (प्रतिनिधी)