अनुराग हरविला !
By Admin | Updated: August 8, 2014 01:12 IST2014-08-08T01:12:28+5:302014-08-08T01:12:28+5:30
चार दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करणाऱ्या अनुराग अनिल खापर्डेला त्याच्या कुटुंबीयांनी, आप्तांनी दीर्घायुषी होण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले होते. मित्र-मैत्रिणींनीही ‘तूम जियो हजारो साल’

अनुराग हरविला !
खापर्डे कुटुंबावर दु:खाचा डोंगर : ते आनंदाचे क्षण
नागपूर : चार दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करणाऱ्या अनुराग अनिल खापर्डेला त्याच्या कुटुंबीयांनी, आप्तांनी दीर्घायुषी होण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले होते. मित्र-मैत्रिणींनीही ‘तूम जियो हजारो साल’ म्हणत अनुरागवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ज्या अनुरागला भरभरून आयुष्य जगण्याचे आशीर्वाद, शुभेच्छा दिल्या त्याच अनुरागच्या अंत्ययात्रेत केवळ चारच दिवसानंतर आपल्याला सहभागी व्हावे लागेल, अशी दुष्ट कल्पनाही कुणाच्या मनी नव्हती. मात्र, नियतीने सूड उगवला अन् आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या अनेकांना अनुरागला अंतिम निरोप देण्यासाठी आज त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती निधनाने खापर्डे कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला.
अनुराग दोन बहिणींमध्ये एकटाच. त्याच्यावर सर्वांचेच जीवापाड प्रेम. आईचा सर्वांत लाडका, शिवाय वडिलांचा जीवलग मित्र. तेवढाच तो मनमिळावू. हसमुख. सर्वांना हवाहवासा.
मात्र बुधवारी काळाने क्षणात त्याला सर्वांपासून हिरावले. मुलाच्या निधनाने खापर्डे दाम्पत्याचा आधारच हिरावला. अनुरागला घरी सर्वजण प्रेमाने ‘निक्कू’ नावाने बोलवायचे. अनुरागचा गत २ आॅगस्ट रोजी वाढदिवस झाला. पण त्याची अभियांत्रिकीची परीक्षा सुरू असल्याने, तो वाढदिवस साजरा करू शकला नाही. त्यामुळे बुधवारी परीक्षा आटोपताच, त्याने मित्रांसोबत पार्टीची योजना आखली. अन् बुधवारी रात्री उशिरापर्यंत आनंदात वाढदिवस साजरा केला.
मात्र वाढदिवसाची पार्टी आटोपून रात्री उशिरा घरी परत येत असताना, त्याच्या कारचा भीषण अपघात झाला, अन् क्षणात वाढदिवसाचा आनंद शोकात बुडाला.
वेगानेच केला घात ...
वाढदिवसाला मनासारखी पार्टी करता आली नाही म्हणून अनुरागने आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला अर्थात इतिशाला बर्थ डेनिमित्त शानदार पार्टी देण्यासाठी बुधवारी सायंकाळी सोबत घेतले. यावेळी त्याचा जीवाभावाचा मित्र उज्ज्वल आणि त्याची मैत्रिण श्रेयासुद्धा सोबत होती. त्यांनी वाडीजवळच्या क्लब अॅसेस लॉऊंजमध्ये पार्टी केली अन् नागपूरला परत निघाले. मध्यरात्र झाल्यामुळे की काय अनुरागने कारचा वेग जरा जास्तच वाढवला अन् वेगानेच घात केला.
आईची प्रतीक्षा कायमच!
अनुरागची आई काल रात्री उशिरापर्यंत आपल्या लाडक्या मुलाची घरी प्रतीक्षा करीत होती. परंतु रात्री उशिरा मुलाऐवजी त्याच्या अपघाताची बातमी घरी पोहोचली. मुलाचा गंभीर अपघात झाल्याचे कळताच, खापर्डे दाम्पत्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र अपघात एवढा भयंकर होता, की अनुराग जागीच ठार झाला होता. तरुण मुलाच्या मृत्यूने खापर्डे दाम्पत्य खचून गेले. त्याची आई गुरुवारी सतत अश्रू ढाळत होती.
शिवाय संपूर्ण परिवार शोकाकूल वातावरणात बुडाला होता. अनुराग हा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला शिकत होता. मुलाला कॉलेजमधून येण्यासाठी थोडाही उशीर झाला, तरी त्याची आई काळजी करीत होती. तो आपल्या वडिलांचा मुलापेक्षा एक जिव्हाळ्याचा मित्र होता. त्यांची ती मैत्री परिवारात सर्वांनाच सुपरिचित होती. अनुरागचे वडील अनिल खापर्डे महावितरणमध्ये प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.
ते नुकतेच तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. शिवाय त्याची आई प्रख्यात वकील असून, ह्युमन राईट कमिशनच्या रजिस्ट्रार राहिल्या आहेत.(प्रतिनिधी)