‘अँटी-शॉक गारमेंट्स’ने वाचणार प्रसूती मातांचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 07:00 AM2022-02-19T07:00:00+5:302022-02-19T07:00:02+5:30

Nagpur News प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकलमध्ये येणाऱ्या अतिरक्तस्रावाच्या मातांना ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ घालून व गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’ टाकून पाठविल्यास वाटेत रुग्ण गंभीर होण्याचे टाळता येत असल्याचे पुढे आले आहे.

Anti-Shock Garments save the pregnant woman | ‘अँटी-शॉक गारमेंट्स’ने वाचणार प्रसूती मातांचा जीव

‘अँटी-शॉक गारमेंट्स’ने वाचणार प्रसूती मातांचा जीव

googlenewsNext
ठळक मुद्देमेडिकलच्या स्त्रीरोग विभागाचा अभ्यास अतिरक्तस्रावाच्या ७१ मातांना मिळाले जीवनदान

सुमेध वाघमारे

नागपूर : प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव आणि रक्तदाबाशी निगडित समस्या ही मातामृत्यूंची मुख्य कारणे आहेत. मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाने याचा अभ्यास करून दुर्गम भागातील किंवा गावखेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकलमध्ये येणाऱ्या अतिरक्तस्रावाच्या मातांना ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ घालून व गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’ टाकून पाठविल्यास वाटेत रुग्ण गंभीर होण्याचे किंवा मृत्यू होण्याची शक्यता टाळता येत असल्याचे पुढे आले. मागील वर्षात याच अभ्यासातून ७१ मातांना जीवनदान मिळाले.

            मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात केवळ विदर्भच नाही तर आजूबाजूच्या चार राज्यातून रुग्ण येतात. २०१८ मध्ये या विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी व सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष झरारिया यांनी ‘हार्वर्ड युनिव्हर्सिटी’शी मिळून ‘क्वाॅलिटी पीपीएच इमर्जन्सी केअर प्रकल्प’ हाती घेतला. यात प्रसूतीनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे मेडिकलमध्ये ‘रेफर’ होऊन आलेल्या मातांवर ‘इमर्जन्सी क्लिनिकल केअर’, ‘सांघिक कार्य व संवाद’, ‘नेटवर्क एकीकरण’ व ‘सुविधा तत्परता’ या चार टप्प्यांवर काम करण्यात आले. यामुळे अतिरक्तस्रावामुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले. आता याच्या पुढचे पाऊल म्हणजे, अतिरक्तस्रावाच्या मातांवर ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ व गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’चा वापर करून मातामृत्यू रोखणे होते. त्यात या चमूला मोठे यश मिळाले आहे.

- असा केला अभ्यास

मेडिकलमध्ये २०२१ मध्ये प्रसूतीपश्चात अतिरक्तस्रावाचा (पोस्टपार्टम हॅमरेज) १३२ माता उपचारासाठी विविध भागातून आल्या. यातील ७१ मातांना त्यांच्या गावखेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून किंवा रुग्णालयातून ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स व गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’ टाकून मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तर ६१ महिलांना यातील काहीच उपलब्ध होऊ शकले नाही. ७१ मातांमधून एकीचाही मृत्यू झाला नाही तर , ६१ महिलांमधील ५ टक्के महिलांचा मृत्यू झाला.

-काय आहे ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’

ग्रामीण किंवा दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या परंतु अतिरक्तस्रावामुळे जीव धोक्यात आलेल्या मातांना ‘मेडिकल’मध्ये पाठविले जाते. या मातांना पाठविण्यापूर्वी ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ दोन्ही पायातून वा पोटावर घातले जाते. हा एक प्लॅस्टिकसारखा त्वचेला घट्ट चिटकणारा कपडा असतो. यामुळे पायातील रक्त मेंदू आणि हृदयाला जाते. रुग्ण बेशुद्धावस्थेत जात नाही, तो शुद्धीवर राहतो. विशेष म्हणजे, यात रक्तस्रावामुळे कमी झालेला रक्तदाब तो वाढविण्यास मदतही करते. शिवाय, गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’ टाकल्यास रक्तस्राव कमी होतो. रुग्ण मेडिकलमध्ये पोहोचेपर्यंत उपचारासाठी वेळ मिळतो.

-मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य 

‘रेफर’होऊन मेडिकलमध्ये येणाऱ्या अतिरक्तस्राव मातांची संख्या मोठी आहे. यांच्यात मृत्यूचे प्रमाणही मोठे होते. ते कमी करण्यासाठी २०१८ मध्ये ‘क्वालिटी पीपीएच इमर्जन्सी केअर प्रकल्प’ हाती घेतला. याच्या आता दुसऱ्या टप्प्यात ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ व ‘बलून टॅम्पोनेड’चा वापर करण्यात आला. यात मोठे यश आले आहे. याचा वापर न केलेल्या मातांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे किंवा अतिदक्षता विभागात त्यांना उपचार करावे लागल्याचे पुढे आले आहे.

-डॉ. आशिष झरारिया, स्त्री रोग व प्रसूती विभाग, मेडिकल

-प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले ‘गारमेंट्स’ 

आयसीएमआरचे राहुल गजभिये यांनी ‘मेड इन सिंगापूर’चे ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ उपलब्ध करून दिले. यातील काही ‘गारमेंट्स’ उपसंचालक आरोग्य विभागाकडून दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला वितरित करण्यात आले. अतिरक्तस्रावाच्या मातांना हे ‘गारमेंट्स’ घालून पाठवत असल्याने रुग्णांचा जीव वाचविणे शक्य झाले आहे.

-डॉ. अनिल हुमणे, स्त्री रोग व प्रसूती विभाग, मेडिकल

Web Title: Anti-Shock Garments save the pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य