Anti-radiation chips made from cow dung | गाईच्या शेणापासून तयार केली ‘अ‍ॅन्टी रेडिएशन चीप’

गाईच्या शेणापासून तयार केली ‘अ‍ॅन्टी रेडिएशन चीप’

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ महामारीच्या संकटाने जीवनशैलीचे चित्रच बदलले आहे. अगदी चारच महिन्यापूर्वी पालक अभ्यास करणाऱ्या मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देत होते पण आज तोच मोबाईल मुलांची शैक्षणिक गरज झाली आहे. मात्र मोबाईलमधून निघणाऱ्या घातक रेडिएशनमुळे मुलांचे डोळे आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी बहुपयोगी गाईचे शेण घातक रेडिएशन रोखण्यात मदत ठरू शकते. अ‍ॅड. नीलेश अंबिलवादे कुटुंबाने ही तांबेमिश्रित गोमय ‘अ‍ॅन्टी रेडिएशन चीप’ तयार केली असून ती रेडिएशन नियंत्रित करण्यास मदत करेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मोबाईलचा उपयोग आता सर्वदूर, सर्वव्यापी झाला आहे. त्यातच कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीत लॉक डाऊन व त्याप्रकारच्या निर्बंधामुळे मोबाईल हा जवळचा ‘टाइम पास’चा सोबती झाला. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा- महाविद्यालये बंद असल्याने मोबाईल तसेच घरचे संगणक व लॅपटॉप हे शैक्षणिक गरज झाले आहेत. वेळेच्या गरजेनुसार ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल हे सर्वात मोठे माध्यम झाले आहे. मात्र मोबाईलपासून निघणारे रेडिएशन ही वर्तमान काळातील भीषण समस्या ठरली आहे. केवळ मानवी आरोग्यच नाही तर पशुपक्षी आणि पर्यावरणावरही त्याचे घातक परिणाम दिसायला लागले आहेत. त्यामुळे या घातक रेडिएशनपासून संरक्षण मिळविणे हे जगभरातील शास्त्रज्ञांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.

नागपुरात अ‍ॅड. अंबिलवादे यांच्या कुटुंबाने या गोमयपासून अनेक दैनंदिन जीवनोपयोगी वस्तूंची निर्मिती करून नवी दिशा दिली आहे. उत्सव काळातील देवादिकांच्या मूर्तींपासून ते दिवे, दीपमाळा अशा अनेक वस्तू उपयोगात येत आहेत. यातच अ‍ॅन्टी रेडिएशन चीप ही यावर्षीची नवीन निर्मिती होय. यामिनी नीलेश अंबिलवादे यांनी याबाबत माहिती दिली. शेण, गोमूत्र व तांब्याच्या मिश्रणातून ही चीप तयार केली आहे. ती मोबाईलच्या मागे चिटकवून किंवा कव्हरच्या आतमध्ये ठेवली जाऊ शकते. मुलांचा वाढलेला मोबाईल वापर बघता ही चीप तयार केल्याचे त्यांनी सांगितले. तांबे हे रेडिएशन रोधक आहे आणि गोमयमध्येही ते गुणधर्म आहेत. आम्ही प्रमाणित दावा करू शकत नसलो तरी गेल्या काही दिवसातील स्वत:च्या अनुभवातून ही गोमय चीप रेडिएशनवर नियंत्रण ठेवण्यास लाभकारी असल्याचे मत यामिनी यांनी व्यक्त केले.

गोमय राख्या, ब्रेसलेट व बरेच काही
अंबिलवादे कुटुंबाने संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात शेण व गोमूत्रापासून अनेक कलात्मक वस्तूंची निर्मिती केली आहे. रक्षाबंधनात बहीण- भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राख्या ही यावर्षीची महत्त्वाची निर्मिती. पंचगव्यापासून निर्मित या राख्यांना यामिनी यांनी कापड व कागदाच्या फुलांनी सजवून अतिशय आकर्षक रूप दिले आहे. त्यांचा मुलगा आदर्श याचाही मोठा सहभाग आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासह पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभदायक असल्याचे यामिनी यांनी सांगितले. याशिवाय पंचगव्यापासून जपमाळा, बांगड्या, हातांचे कडे, कानातील झुमके, मोतीहार आणि आकर्षक ब्रेसलेटही त्यांनी तयार केले आहेत.

 

Web Title: Anti-radiation chips made from cow dung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.