‘एनव्हीसीसी’चे माजी अध्यक्ष मेहाडियाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 22:36 IST2023-02-23T22:34:11+5:302023-02-23T22:36:54+5:30
Nagpur News ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’चे माजी अध्यक्ष अश्विन मेहाडियाविरोधात पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘एनव्हीसीसी’चे माजी अध्यक्ष मेहाडियाविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
नागपूर : ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’चे माजी अध्यक्ष अश्विन मेहाडियाविरोधात पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनव्हीसीसीचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या तक्रारीवरून सिताबर्डी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एनव्हीसीसी’ ही विदर्भातील आघाडीची व्यापारी संघटना आहे. ‘एनव्हीसीसी’तील आमसभेतील राड्यानंतर मेहाडियाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता अग्रवाल यांनी आणखी एक तक्रार दाखल केली व त्या आधारावर गुन्हा दाखल झाला. अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार मेहाडियाचा ‘डीआयएन’ क्रमांक ‘रजिस्ट्रार ऑफ कंपनीज’ने ब्लॉक केल्यानंतरदेखील निवडणूक लढविली व ‘एनव्हीसीसी’चे अध्यक्षपद मिळविले.
‘एनव्हीसीसी’ला भारतीय निर्यातदारांना ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ देण्याचे अधिकार आहेत. मेहाडियाने स्वत:च्या आर्थिक लाभासाठी सचिव रामअवतार तोतलाशी संगनमत करत सदस्य नसलेल्या मेहूल शहाला हे ‘सर्टिफिकेट’ देण्याचा अधिकार मिळवून दिला. यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच ‘एनव्हीसीसी’च्या ३५ हजार फुटांच्या जागेची मालकी २००८ साली रमेश रांदड यांच्याकडे आली. ती जागा रिकामी न केल्यामुळे मध्यप्रदेश मर्चंट ऑफ कॉमर्स प्रा.लि.ने न्यायालयात याचिका दाखल केली होती व ती जागा रिकामी करण्याचे न्यायालयाने ‘एनव्हीसीसी’ला आदेश दिले होते.
मेहाडियाने रांदड यांच्याशी तडजोड करून १०० कोटींच्या जागेच्या बदल्यात २०२१ मध्ये ‘एनव्हीसीसी’ला दाेन कोटींची दुसरी जागा व २.५१ कोटींचा धनादेश मिळवून दिला. या व्यवहारात मेहाडियाने ‘एनव्हीसीसी’च्या सदस्यांची दिशाभूल करत कोट्यवधींचा लाभ घेतला. मेहाडियाने बैठकीचे नकली कार्यवृत्त तयार केले व खोटे दस्तावेजदेखील तयार केले, असा आरोप अग्रवाल यांनी केला. या प्रकरणात प्राथमिक चौकशीनंतर सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.