पॉलिटेक्निक कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर
By Admin | Updated: June 21, 2014 02:43 IST2014-06-21T02:43:16+5:302014-06-21T02:43:16+5:30
विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळालेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप राऊंडचे .

पॉलिटेक्निक कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर
नागपूर : विद्यार्थ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळालेल्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्जदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना हे अर्ज आॅनलाईन भरायचे असून एआरसी केंद्रांवर जाऊन ‘कन्फर्म’ करायचे आहेत.
पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेत ४ प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. चौथ्या फेरीत मात्र समुपदेशनाद्वारे प्रक्रिया राबविली जाईल. दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. याबद्दलची आणखी माहिती विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. गेल्या काही वर्षापासून पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साह दिसून येत आहे. नागपूर विभागातील सर्व ७१ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. २०१२ साली ६ हजारांहून अधिक जागा रिक्त होत्या. तर मागील वर्षी ७१ महाविद्यालयांतील २५ हजार ६९१ जागांपैकी ९ हजार ४४१ जागा रिक्त होत्या.(प्रतिनिधी)