सेविकांनी संविधान चौकात भरविली अंगणवाडी!
By मंगेश व्यवहारे | Updated: January 25, 2024 13:31 IST2024-01-25T13:31:06+5:302024-01-25T13:31:51+5:30
सेविकांनी आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनाच्या स्थळी चिमुकल्यांची अंगणवाडी भरवून सरकारच्या धोरणाचा निषेध करीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण व आहार दिला.

सेविकांनी संविधान चौकात भरविली अंगणवाडी!
नागपूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संप संविधान चौकात सुरू आहे. सेविकांनी आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनाच्या स्थळी चिमुकल्यांची अंगणवाडी भरवून सरकारच्या धोरणाचा निषेध करीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण व आहार दिला. १९७५ पासून एकात्मिक बालविकास योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत.
वेळोवेळी त्यांच्या मानधनात वाढ झाली पण ती महागाईच्या प्रमाणात तुटपुंजी होती. २०२३ मध्येही १५०० रुपयांची वाढ करण्यात आली ती देखील अत्यल्प होती. तेव्हापासून हजारो कर्मचारी निवृत्त झाल्या पण निवृत्तीनंतर त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही. शिवाय कुपोषण नियंत्रण, लसीकरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांची सेवा घेतली जाते पण लाभ मिळत नाही.
२००५ मध्ये पेंशन बाबतचा पहिला शासन निर्णय झाला, पण २०२४ येवून ही अमलबजावनी झाली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका गेल्या ५२ दिवसांपासून संविधान चौकात संप करीत आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन व सरकारपुढे आपल्या मागण्या रेटल्या आहेत.