अंगणवाडी साहित्य खरेदीचा घोळ; सीडीपीओ म्हणतात आम्ही २६ एप्रिललाच रेकॉर्ड दिला
By गणेश हुड | Updated: May 8, 2024 20:19 IST2024-05-08T20:19:35+5:302024-05-08T20:19:56+5:30
अंगणवाडी साहित्य खरेदीचा घोळ : चौकशी अहवालाची प्रतिक्षा

अंगणवाडी साहित्य खरेदीचा घोळ; सीडीपीओ म्हणतात आम्ही २६ एप्रिललाच रेकॉर्ड दिला
नागपूर : केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा रेकॉर्ड २६ एप्रिल रोजी चौकशी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती बुधवारी जिल्ह्यातील चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर (सीडीपीओ) यांनी दिली.
चौकशी अधिकाऱ्यांना बार कोड लावून कागदपत्रे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. आता या संदर्भात आमच्याकडे कुठल्याही स्वरुपाचे रेकॉर्ड नाही.अंगणवाडी केंद्रांना साहित्याचा पुरवठा झाला असल्याचा दावा सीडीपीओंनी केला आहे.
अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यापूर्वीच पुरवठादाराला बील देण्यात आल्याचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी दिले होते. चौकशी समिती मंगळवारी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल सादर करणार होती. मात्र समितीने सीईओ यांना अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात याबाबतचा अहवाल सीईओ यांना सादर केला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेंतर्गत अंगणवाड्यांमची डागडुजी, बांधकाम, सौर प्रकल्प, दरवाजे, खिडकी आदीसोबत पिण्याच्या पाणी सोय, बेबी फ्रेंडली शौचालय, सुरक्षा भिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बाल विकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. यासाठी दोन टप्प्यात एक कोटी ६ लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. परंतु साहित्य खरेदी प्रक्रीयेत घोळ झाला असून तारीख नसलेले कोटेशन काही अंगणड्यांनी जोडल्याचे निदर्शनास आले आहे. चौकशी समितीच्या अहवालानतंरच या प्रकरणातील सत्य पुढे येण्याची शक्यता आहे.