अॅनिमिया क्लिनीकमुळे जोखमी मातांचा वाचणार जीव!
By सुमेध वाघमार | Updated: July 13, 2024 18:22 IST2024-07-13T18:21:40+5:302024-07-13T18:22:23+5:30
डागा रुग्णालय : गर्भवतींचे धोक्याचा आधारावर चार रंगात वर्गीकरण

Anemia clinic will save lives of mothers at risk!
सुमेध वाघमारे
नागपूर : हिमोग्लोबिनची कमतरता आणि प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्रावामुळे माता मृत्यूचा धोका वाढतो. अशा उच्च जोखमीच्या गरोदर मातांसाठी डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयात ‘अॅनिमिया क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. मातांचा जीव वाचविण्यासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
डागा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांची संख्या अधिक आहे. येथे दररोज जवळपास ३० ते ५० प्रसूती होतात. यापैकी सुमारे ५० टक्के महिला जोखीम गटातातील असतात. या महिलांची प्रसूती दरम्यान येणारी गुंतागुंत टाळण्यासाठी डागा रुग्णालयात अॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत स्वतंत्र क्लिनीक सुरू करण्यात आले. येथे दर तीन महिन्यांनी गरोदर मातांच्या हिमोग्लोबिन पातळीचे परीक्षण केले जाते. कमतरता आढळल्यास गरोदर मातांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यावर भर दिला जातो.
वर्षभरात ९३७ महिलांना लाभ
मागील वर्षात जोखमीच्या ९३७ गर्भवती महिलांना ‘आर्यन सुक्रोज’ इंजेक्शनचे ३,७४८ डोस देण्यात आले. गेल्या जूनमध्ये १०६ गर्भवती महिलांना ४२५ डोस देण्यात आले. त्यामुळे त्यांची हिमोग्लोबिन पातळी वाढली असून सुरक्षित प्रसूती होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे.
गर्भवतींचे कलर कोडिंग वर्गीकरण
उच्च जोखमींच्या गर्भवती महिलांचे धोक्याच्या आधारावर कलर कोडिंग वर्गीकरण केले जाते. पिवळा, हिरवा, निळा आणि लाल या चार रंगांमध्ये वर्गीकृत करण्यात येते. महिलांच्या नोंदणी कार्डावर हे रंग असतात. थायरॉईड रुग्णांसाठी पिवळे, सामान्यसाठी हिरवे, उच्च रक्तदाबासाठी निळे आणि उच्च जोखमीसाठी लाल चिन्हांकन केले जाते. या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी दर तीन महिन्यांनी तपासली जाते. त्या आधारावर हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आहारविषयक सल्ले आणि आयर्न सप्लिमेंट्स दिले जातात. हिमोग्लोबिनची पातळी वाढत नसल्यास, लोह सुक्रोजचे चार डोस दिले जातात.