अन् स्टारबसने घेतला पेट
By Admin | Updated: June 12, 2014 01:17 IST2014-06-12T01:17:19+5:302014-06-12T01:17:19+5:30
स्टारबसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बस सुरू करताच बसच्या इंजिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे चालकाने समयसूचकता बाळगत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले

अन् स्टारबसने घेतला पेट
सुदैवाने प्राणहानी टळली : बुटीबोरी येथील घटना
बेला : स्टारबसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बस सुरू करताच बसच्या इंजिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे चालकाने समयसूचकता बाळगत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि क्षणार्धात या स्टारबसने पेट घेतला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना बुटीबोरी येथील एमआयडीसी चौकात बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
बसचालक युवराज गुलाबराव बाजारे (४२, रा. सुभेदार ले-आऊट, नागपूर) हा एमएच-३१/सीए-६२२९ क्रमांकाच्या स्टारबसमध्ये काही प्रवासी घेऊन बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील मुरारजी कंपनी चौकातून नागपूरकडे यायला निघाला. थांबा असल्याने ही बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक एमआयडीसी चौकात थांबली. येथे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर युवराज बाजारे याने ही बस सुरू केली. गियर टाकताच या बसच्या इंजिनमधून धूर बाहेर येत असल्याचे बसचालकाच्या निदर्शनास आहे. त्यामुळे त्याने समयसूचकता बाळगत स्वत: बसखाली उतरला आणि बसमधील सर्व प्रवाशांना उतरविले. यावेळी प्रवाशांनीही प्रसंगावधान बाळगत उतरण्यासाठी गोंधळ केला नाही.
या बसमध्ये अंदाजे २५ प्रवासी होते. प्रवासी बसमधून उतरताच त्यांना काही कळण्याच्या आत या बसने पेट घेतला. लागलीच सदर घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. अंदाजे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती बुटीबोरी पोलिसांनी दिली. यात बसचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. (वार्ताहर)