अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के
By Admin | Updated: June 13, 2017 16:07 IST2017-06-13T16:07:25+5:302017-06-13T16:07:25+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला.
अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के लागला आहे. गतवर्षी अमरावती विभागाचा निकाल ८४.९९ टक्के लागला होता. यावेळी निकाल ०.६६ टक्क्यांनी माघारला आहे. ९ विभागीय मंडळांपैकी अमरावती विभागाने निकालांच्या टक्केवारीत सातवा क्रमांक पटकावला आहे.
बुलडाणा जिल्ह्याने निकालात आघाडी घेतली असून यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलडाण्याची टक्केवारी ८८.४९ टक्के, वाशिम ८७.३७, अमरावती ८५.१५, यवतमाळ ७८.०३ तर अकोला जिल्ह्याची टक्केवारी ८४.०२ आहे. अमरावती विभागातील २,५२४ शाळांमधून एकूण १ लाख ७४ हजार ८१० विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ०४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४६,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ७६,९५६ मुले, तर ६९,८४६ मुली आहेत. निकालात यंदाही मुलींचा वरचष्मा असून विभागातून ८८.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्के वारी ८१.२४ इतकी आहे.
यंदा गैरमार्गाचा अवलंब केल्याची ११६ प्रकरणे अमरावती विभागात निदर्शनास आलीत. यात ११४ विद्यार्थी दोषी सिद्ध झाले असून २ प्रकरणे निर्दोष ठरविण्यात आले आहेत. अकोल्यातील ३५ प्रकरणांपैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहे. अमरावती २५ पैकी शून्य निर्दोष, बुलडाणा ३० पैकी एक निर्दोष, यवतमाळ १५ पैकी एक निर्दोष, वाशिम ११ पैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान ५६ आक्षेपार्ह प्रकरणे निदर्शनास आले होती. त्यापैकी ४३ विद्यार्थी निर्दोष ठरले आहेत तर १३ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. यावेळी चित्रकला ४,८९६, शास्त्रीय कला २११, लोककला ६, तर क्रीडा प्रकारातून ४७४ विद्यार्थ्यांनी गुणांची सवलत घेतली आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसेच मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
काही तांत्रिक अडचणींमुळे निकाल लांबणीवर पडला. बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झालेला निकाल अधिकृत असून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. बुधवारपासून पुनर्मूल्यांकनास सुरूवात होईल. पुरवणी परीक्षा जुलै, आॅगस्टमध्ये घेतली जातील.
- संजय गणोरकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती.