नागपुरातील आयडीबीआय कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 23:46 IST2018-11-23T23:45:38+5:302018-11-23T23:46:21+5:30
आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर पोहचली आहे.

नागपुरातील आयडीबीआय कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयडीबीआयच्या पावणेदोन कोटींच्या पीक कर्ज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांना पुन्हा एक घोटाळा हाती लागला आहे. त्यानुसार, आरोपींनी भुश्याची पोती दाखवून ते तांदूळ आहे, अशी बतावणी करत अडीच कोटींचे कर्ज उचलले. त्यामुळे आता या कर्ज घोटाळ्याची रक्कम ४ कोटी ३० लाखांवर पोहचली आहे.
२०१३ - २०१४ या कालावधीत आयडीबीआय बँकेच्या गोधनी शाखेतून बनावट कागदपत्रांच्या आधाारे पावणेदोन कोटींचे कर्ज लाटले. कर्जाची परतफेड न झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केल्यानंतर हा कर्जघोटाळा पुढे आला. त्यानंतर बँकेतर्फे गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली. चौकशीनंतर गुन्हे शाखेने १९ नोव्हेंबरला मानकापूर ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील प्रशांत पुंडलिकराव बोरकर, राजेश कोठीराम गुहे, संतोष बजरंग नंदागवळी, अनिल हिरामण घोडे, सारंग अशोकराव चिटकुले, सचिन अशोकराव चिटकुले, विक्रांत अमृत कंगाले, रामाजी कवडूजी भेंडे, जसवंतसिंह बलविरसिंह प्रधान, पतिराम बाबूलाल बावणकर, लखनलाल चंदनलाल राठोड आणि योगिराज बालकिसन बिटले यांना पोलिसांनी अटक केली. तर मंजितसिंग प्रधान, योगिराज आदे, अनुपसिंग प्रधान आणि विकास काकडे फरार आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून त्यांनी भंडारा जिल्ह्यातून आयडीबीआय बँकेतूनही पीक आणि गोदामाच्या नावाने अडीच कोटींचे कर्ज उचलल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी हे कर्ज उचलण्यापूर्वी एका ठिकाणी गोदामात भुसा भरलेले पोते ठेवले. त्यावर दर्शनी भागात तांदळाची पोती ठेवली. ही सर्व तांदळाची पोती आहेत, असे आरोपींनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले आणि अधिकाऱ्यांनीही त्यावर विश्वास ठेवून कर्जाची रक्कम आरोपींच्या हातात दिल्याची माहिती पुढे आली आहे.
अधिकाऱ्यांची भूमीका संशयास्पद
या एकूणच प्रकरणात आरोपींसोबत बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोट्यवधीचे कर्ज उपलब्ध करून देताना बँक अधिकारी एवढे गाफिल कसे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास या प्रकरणात अनेक बडे मासे पोलिसांच्या हाती लागू शकतात.