बलात्काराच्या प्रकरणात आंबेकरला कारागृहातच अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:00 IST2019-11-07T00:59:13+5:302019-11-07T01:00:07+5:30
पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगमास्टर संतोष आंबेकर याला बलात्काराच्या प्रकरणात बुधवारी थेट कारागृहातच अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल.

बलात्काराच्या प्रकरणात आंबेकरला कारागृहातच अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांच्या गुन्हे शाखेने गँगमास्टर संतोष आंबेकर याला बलात्काराच्या प्रकरणात बुधवारी थेट कारागृहातच अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल. १२ ऑक्टोबरपासून तो अटकेत असून नवनव्या गुन्ह्याखाली त्याच्यावर कलमा दाखल होत आहेत. त्याच्या विरोधात पाच कोटी रुपयांच्या ठगबाजीचा आणि एक कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप आहे. लकडगंज येथील एका युवतीच्या यौन शोषण प्रकरणी आता त्याच्यावर नवा गुन्हा दाखल झाला आहे.
ही युवती अवयस्क असताना आंबेकरकडून तिचे यौन शोषण होत होते, असा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पीडितेला मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांमध्ये नेले होते. तिच्या घरीही त्याचे येणेजाणे असायचे. तो आपल्या कार्यालयातही तिचे शोषण करायचा. तिला मोठे नेते, विख्यात माणसे, मुंबईतील गुन्हेगारी जगतातील माणसांसोबत त्याचे असलेली छायाचित्र दाखवून तो घाबरवत असे. यामुळेच आजवर तिने पोलिसात तक्रार केली नव्हती. मात्र ठगबाजी आणि वसुलीच्या प्रकरणात आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदार याच्या अटकेनंतर तिने हिंमत केली आणि पोलिसात तक्रार दाखल केली.
ठगबाजी, वसुली या प्रकरणी मकोकामधील पोलीस कोठडी संपल्यापासून आंबेकर कारागृहात आहे. त्याचा सहकारी राजा अरमरकर आणि अन्य आरोपीही कारागृहात आहेत. पोलिसांनी न्यायाालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवून बुधवारी आंबेकरला कारागृहातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेकरची काही विश्वासू माणसे सुरुवातीला त्या पीडित युवतीला प्रभावित करण्याच्या कामी लागले होते. मात्र आंबेकरविरूद्ध आरोप दाखल होण्याची मालिका सुरू होताच त्यांनी हा नाद सोडला.
आंबेकरने पीडित युवतीप्रमाणेच अनेक महिलांचेही यौन शोषण केल्याचे सांगितले जाते. मात्र अशा प्रकरणांच्या तक्रारीसाठी आतापर्यंत एक-दोन महिलाच पुढे आल्या आहेत.