गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून वेतनासोबतच समायोजनातही घोळ
By गणेश हुड | Updated: February 28, 2024 18:52 IST2024-02-28T18:51:54+5:302024-02-28T18:52:14+5:30
मोठ्या पटसंख्येच्या एकशिक्षकी शाळांऐवजी बहुशिक्षकीय शाळांवर पदस्थापना

गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून वेतनासोबतच समायोजनातही घोळ
नागपूर : पंचायत समिती नागपूर मधील शिक्षकांच्या वेतनाच्या अनियमिततेबाबतचे प्रकरण ताजे असतानाच गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून समायोजन प्रक्रीयेतही घोळ झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. यामुळे पंचायत समितीमधील २८६ शिक्षकांचे वेतन दहा ते पंधरा हजार रूपयाच्या फरकाने कमी -अधिक झाले आहेत. कमी वेतन झालेल्या दिडशे शिक्षकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे. कर्ज हप्ते थकीत झाल्याने अतिरिक्त व्याजाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जवळपास तेवढ्या शिक्षकांच्या वेतनात रक्कमांचे अतिप्रदान झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे.जिल्हा परिषदेकडे तक्रार झाल्यानंतर त्यामध्ये दुरूस्ती करून समायोजनात झालेल्या पदस्थापनेत बदल करण्यात आला. तर शासन निर्णयातील तरतुदीनुसार द्विशिक्षकी शाळांतील जागा प्राधान्याने भरण्याचे निर्देश असूनही गटशिक्षणाका-याकडून बहूशिक्षकी शाळेत अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्या. एवढेच काय एकीकडे शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना नागपूर पंचायत समिती क्षैत्रातील काही द्विशिक्षकी शाळांत तीन शिक्षक कार्यरत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
अन्यथा शिक्षक समिती करणार आंदोलन
शिक्षकांचे पगारातील घोळ , समायोजनातील अनियमितता , शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे करण्यात येत असलेले दुर्लक्ष या सर्व बाबींमुळे शिक्षक त्रस्त आहेत , त्यामुळे नागपूरच्या विद्यमान गटशिक्षणाधिकारी यांचेकडील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधिक्षक पदाचा कार्यभार त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास लवकरच पंचायत समिती कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात येईल.
-लीलाधर ठाकरे , जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ,नागपूर