कौशल्याबरोबरच, रोजगारक्षम विद्यार्थी घडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:22+5:302020-12-27T04:06:22+5:30

नागपूर आयटीआय प्रथमच राबवितेय ‘ड्युएल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग’ : उद्योगाशी केला सामंजस्य करार मंगेश व्यवहारे नागपूर : शासकीय औद्योगिक ...

Along with skills, employable students will happen | कौशल्याबरोबरच, रोजगारक्षम विद्यार्थी घडणार

कौशल्याबरोबरच, रोजगारक्षम विद्यार्थी घडणार

नागपूर आयटीआय प्रथमच राबवितेय ‘ड्युएल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग’ : उद्योगाशी केला सामंजस्य करार

मंगेश व्यवहारे

नागपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नागपूरने पुन्हा एकदा नावीन्यपूर्ण योजना राबविली आहे. यामध्ये विद्यार्थी अर्धे वर्ष प्रशिक्षण संस्थेत व अर्धे वर्ष प्रत्यक्ष उद्योगात प्रशिक्षण घेणार आहे. राज्यात नागपूर आयटीआयने सर्वप्रथम ही योजना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आहे. ड्युएल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग असे योजनेचे नाव असून, या माध्यमातून विद्यार्थी कौशल्य विकसित करण्याबरोबरच उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन रोजगारक्षम बनणार आहे.

नागपूर आयटीआयने यासाठी ट्रॅक्टर मॅकेनिक या ट्रेडची निवड केली आहे. यासाठी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. नागपूर आयटीआयमध्ये जवळपास २७ ट्रेड (अभ्यासक्रम) आहेत. बहुतांश अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आठवडा, दोन आठवड्यासाठी कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. पण ड्युएल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग योजनेत ७ महिने आयटीआयमध्ये व ५ महिने उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. यंदा २४ विद्यार्थ्यांची पहिली बॅच याचे प्रशिक्षण घेणार आहे. या योजनेसाठी डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग नवी दिल्ली यांनी मंजुरी दिली आहे. येत्या १ जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरवात होणार आहे. यामध्ये प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यास विद्यावेतन देण्यात येईल. अभ्यासक्रमासंदर्भात नागपूर आयटीआयने महिंद्रा अ‍ॅण्ड महिंदा कंपनीला प्रस्ताव दिला होता. कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर श्रीकांत दुबे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागपूर आयटीआयने दोन वर्षापूर्वी देशात पहिल्यांदाच अ‍ॅरोनॉटिकल स्ट्रक्चर अ‍ॅण्ड इक्युपमेंट फीटर हा अभ्यासक्रम सुरू केला होता.

- प्रमाणपत्रावर राहील उद्योगाचे नाव

ड्यूएल सिस्टिम ऑफ ट्रेनिंग या योजनेअंतर्गत एनसीव्हीटी नवी दिल्ली यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात येईल व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षण प्रमाणपत्रावर संबंधित उद्योगाचे नाव राहील. त्यामुळे सदर प्रमाणपत्रास अधिक महत्त्व प्राप्त होईल.

- विद्यार्थ्यांचा चौफेर फायदा

एका वर्षाच्या अभ्यासक्रमात ५ महिन्यांचा कंपनीत प्रत्यक्ष अनुभव. त्यानंतर १ वर्षासाठी अ‍ॅप्रेन्टिसशिपची संधी. असा दीड वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाल्यानंतर विद्यार्थी रोजगारक्षम होईल. आम्ही पुढे उद्योगाशी निगडित असलेल्या ट्रेडबाबतीत हीच योजना लागू करण्याच्या प्रयत्नात आहोत.

हेमंत आवारे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर

Web Title: Along with skills, employable students will happen