महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:33 IST2025-12-10T05:32:14+5:302025-12-10T05:33:01+5:30
गेले काही दिवस भाजप आणि शिंदेसेनेत विशेषत: नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आणि एकमेकांची माणसे घेण्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
नागपूर : नगरपरिषद निवडणुकीत झाले ते झाले आता भाजप-शिंदेसेनेने वाद विसरायचा आणि महापालिका निवडणुकीत एकत्रितपणे लढायचे असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या तीन तासांच्या बैठकीत घेण्यात आला.
गेले काही दिवस भाजप आणि शिंदेसेनेत विशेषत: नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आणि एकमेकांची माणसे घेण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र, महापालिकेत याची पुनरावृत्ती न करता एकत्रित लढण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
भाजप आणि शिंदेसेनेच्या प्रत्येक महापालिकेतील चार-चार नेत्यांनी एकत्रित बसून महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा एक फॉर्म्युला तयार करावा.
भाजप आणि शिंदेसेना यांच्यात संघर्षाचे काही टापू आहेत. त्यात शिंदेंचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा भाईंदर, नाशिक या महापालिकांचा समावेश आहे. नाशिक वगळता अन्यत्र दोन पक्षांमध्ये अनेकदा संघर्षाचे प्रसंग गेल्या काही दिवसांत घडले. या ठिकाणी महापालिकेत युती करणे खूपच आव्हानात्मक आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली आणि त्यांचे कान टोचले. सभागृहाच्या कामकाजात जास्तीतजास्त सहभागी व्हा, कामकाज समजून घेत जा. मंत्र्यांनीही बाहेर कुठे जाण्याऐवजी सभागृहात बसून राहिले पाहिजे असे ते म्हणाले. आमदारांनीही चर्चेत सहभागी झाले पाहिजे, असे त्यांनी बजावले.
आमची तीन पक्षांची चर्चा लवकरच होईल, असे बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. प्रत्यक्षात सोमवारी रात्री भाजप-शिंदेसेनेतच चर्चा झाली. अजित पवार गटाचे कोणतेही नेते बैठकीत नव्हते. तीन पक्षांची महायुती म्हणूनच आमची कालची चर्चा झाली, लवकरच अजित पवार यांच्याशीही या संदर्भात चर्चा केली जाईल, असे बावनकुळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.