विदर्भासह तिन्ही विकास मंडळांना मिळणार मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:58+5:302021-02-09T04:10:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भासह राज्यातील तिन्ही विकास मंडळांना मुदतवाढ देण्यात येणार आहे, याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री व ...

विदर्भासह तिन्ही विकास मंडळांना मिळणार मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासह राज्यातील तिन्ही विकास मंडळांना मुदतवाढ देण्यात येणार आहे, याबाबत स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत. विकास मंडळाच्या मुदतवाढीबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
डीपीसीच्या बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी चर्चा करीत होते. यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट काही सांगितले नाही, परंतु विकास मंडळाचे अध्यक्ष व इतर सदस्यांच्या नियुक्तासाठी मुदतवाढीचा निर्णय अडकला असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे विदर्भासोबतच मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेल्या विकास मंडळांचा कार्यकाळसुद्धा ३० एप्रिल२०२० रोजी समाप्त झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकीत यावर चर्चा झाली. मात्र निर्णय होऊ शकला नाही. सूत्रानुसार विकास मंडळाच्या मुदतवाढीच्या निर्णयासोबतच अध्यक्ष व सदस्यांच्या नावांवरही निर्णय व्हावा, असा सरकारचा विचार आहे. विकास मंडळाच्या नियुक्त्या राज्यपालांनी कराव्यात, अशी राज्य सरकारची इच्छा नाही.
बॉक्स
गडचिरोलीत मेडिकल कॉलेज
गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, अशी मागणी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली. याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, या मागणीवर उपमुख्यमंत्री सकारात्मक दिसून आले. याचप्रकारे आजवर ज्या गावांमध्ये वीज पोहोचली नाही अशा २१ गावांमध्ये सबस्टेशनची मागणी करण्यात आली. तसेच नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनाची मागणी सुद्धा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.