नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच; आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 21:03 IST2020-11-21T21:03:08+5:302020-11-21T21:03:29+5:30
Nagpur News School दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे.

नागपूर मनपा क्षेत्रातील सर्व शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच; आयुक्तांचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या पूर्वी कोरोना रुग्ण संख्येत होणारी घट लक्षात घेता शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून स्थानिक प्रशासनाच्या संमतीने सुरू करता येतील असे आदेश निर्गमित केले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यासंदर्भात मनपाने तयारी केली होती. मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता 23 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा सध्या सुरू न करता 13 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्यात येतील, असा आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी जारी केला आहे.
सदर आदेश केवळ महानगरपालिकेच्याच शाळा नव्हे तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी लागू असेल. शाळा बंद राहणार असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहिल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरू ठेवण्यात येतील. उपरोक्त आदेश नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 13 डिसेंबर पर्यंत अंमलात राहतील, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात म्हटले आहे.