कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:14 IST2019-11-08T11:13:23+5:302019-11-08T11:14:41+5:30
फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कॉंग्रेसचे नागपुरातील चारही आमदार जयपूरला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात अद्यापही सत्तास्थापनेच्या दिशेने पावले पडली नसल्याने अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा स्थितीत फुटीची भीती असल्याने प्रदेश कॉंग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचे निश्चित नेले आहे. नागपूर जिल्ह्यातील चारही आमदारांनादेखील जयपूरला तातडीने रवाना होण्यासंदर्भातील निरोप गुरुवारी रात्री उशिरा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कर्नाटकचा अनुभव काँग्रेसच्या गाठीशी आहे. अशा स्थितीत भाजपाकडून कॉंग्रेसच्या आमदारांना सत्तास्थापनेसाठी फोडण्यात येऊ शकते, अशी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी भीती आहे. त्यामुळे सर्व आमदारांना एकत्रित एकाच ठिकाणी नेण्यासंदर्भात सूचना आल्या. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे व त्यामुळे जयपूर हे सुरक्षित स्थान असेल या विचारातून गुरुवारी जयपूरचे नाव निश्चित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फोन करुन चारही आमदारांना ही माहिती दिली. पश्चिम नागपुरचे आमदार विकास ठाकरे हे गुरुवारी नागपुरात होते. त्यांनादेखील रात्री उशिरा निरोप मिळाला. शुक्रवारी सकाळी अगोदर नवी दिल्ली व तेथून जयपूरकडे रवाना होणार आहेत.