नागपूरची अख्खी शहर काँग्रेस दिल्ली दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 10:56 AM2018-03-07T10:56:16+5:302018-03-07T10:56:24+5:30

नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले.

All the city of Nagpur Congress in Delhi Court | नागपूरची अख्खी शहर काँग्रेस दिल्ली दरबारात

नागपूरची अख्खी शहर काँग्रेस दिल्ली दरबारात

googlenewsNext
ठळक मुद्देमुत्तेमवार-ठाकरे गटासह चतुर्वेदी समर्थकही दाखल ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन मांडली बाजू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले. तर माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे चतुर्वेदी यांच्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी समर्थकांना घेऊन दिल्लीत पोहचले. दोन्ही गटांनी दिवसभर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या व आपली बाजू मांडली. नागपुरातील काँग्रेस दिल्लीत कुस्ती करीत असल्याने भाजपाला येथे आयते मैदान मोकळे झाल्याचे चित्र आहे.
चतुर्वेदी यांच्यावरील कारवाईनंतर मुत्तेमवार-ठाकरे गटात उत्साह संचारला आहे. कारवाईसाठी नेत्यांचे आभार मानण्याकरिता ठाकरे यांच्या नेतृत्वात समर्थकांचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी विमानाने दिल्लीत पोहचले. काँग्रेस नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अ‍ॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात शहर काँग्रेसने केलेल्या कार्यक्रमांचा आढावा सादर केला.
दुसरीकडे, चतुर्वेदी यांच्यावरील कारवाईनंतर समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे. नुकतेच चतुर्वेदी यांनी होळी मिलन घेत समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. कारवाईनंतरही समर्थकांनी चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर हजेरी लावत आपण अशा कारवाईपुढे नमते घेणार नाही, असे संकेत दिले होते. यानंतर चतुर्वेदी हे दिल्लीत दाखल झाले. आपल्यावरील कारवाई द्वेषपूर्ण व चुकीची असल्याचा मुद्दा समोर करीत ती रद्द करण्यासाठी त्यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली. माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात चतुर्वेदी समर्थकांचे शिष्टमंडळही बुधवारी रेल्वेने दिल्लीत दाखल झाले. त्यांनीही विविध नेत्यांच्या भेटी घेत चतुर्वेदींवरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली. सोबतच शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याचा आग्रह धरला. ठाकरे यांनी ३६ जणांचे शिष्टमंडळ आले असल्याचे सांगत सर्वांची नावे प्रसार माध्यमांकडे जाहीर केली. तर, वनवे यांनी आपल्यासोबत ५५ जण आले असल्याचे सांगितले. मात्र, सर्व नावे जाहीर केली नाहीत. दोन्ही शिष्टमंडळे बुधवारीही दिल्लीत ठाण मांडून राहणार आहेत. दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते कुणाची बाजू घेतात, चतुर्वेदींवरील कारवाई मागे घेतात का की फक्त म्हणणे ऐकून घेत ‘चलने दो’ची भूमिका घेतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. तसेच यावरून कोणत्या गटाचे काँग्रेसमध्ये ‘अच्छे दिन’ आलेत हे देखील स्पष्ट होईल.

Web Title: All the city of Nagpur Congress in Delhi Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.