लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे वाढते संक्रमण आणि सुविधांचा अभाव यामुळे नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरात मद्यपींचे प्रमाण व वावर वाढत चालला आहे. एक जखमी मद्यपी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला आणि त्याने रेनकोट समजून चक्क रुग्णालयातील ‘पीपीई किट’ची चोरून नेली. शिवाय, तो कोरोनाबाधित असल्याचेही टेस्टनंतर स्पष्ट झाले. हा प्रकार नुकताच उघड झाला आहे.शहरातील एक शौकीन बुधवारी (दि. २२) यथेच्छ दारू प्यायला. दारूच्या नशेत तो नालीत पडल्याने जखमी झाला. दोन दिवसाच्या उपचारानंतर त्याला नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. तिथून परत आल्यानंतर त्याच्याकडे ‘पीपीई किट’ आढळून आली. हा रेनकोट असल्याचे तसेच त्याची किंमत एक हजार रुपये असल्याचे त्याने मित्राला सांगितले. हा रेनकोट नसून, ‘पीपीई किट’ असल्याचे काही सुज्ञ तरुणांच्या निदर्शनास आले.परिणामी, या प्रकाराची माहिती स्थानिक नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली. नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून ही ‘पीपीई किट’ ताब्यात घेत जाळून टाकली. चौकशीदरम्यान ती ‘पीपीई किट’ रुग्णालयातून चोरून आणल्याचेही त्याने नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. स्वॅब टेस्टनंतर तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर उपचाराला सुरुवात केली आहे.संपर्कातील व्यक्तींचा शोधतो मद्यपी भाजीपाला विक्रेता असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. तो कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेलेल्या त्याच्या कुटुंबीय व नातेवाईकांसह मित्र व इतरांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्याच्या कुटुंबीयांसह काही मित्रांना क्वारंटाईन करण्यात आल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळला जात असला तरी या काळात शहरात सहज देशी व मोहफुलाची दारू उपलब्ध होते.