मध्यप्रदेशातून दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:24+5:302021-04-14T04:07:24+5:30
पावणे नऊ लाखाच्या दारूसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हे शाखेच्या ...

मध्यप्रदेशातून दारूची तस्करी
पावणे नऊ लाखाच्या दारूसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने पारडी परिसरात उभा असलेल्या एका ट्रकमधून पावणेनऊ लाखांची दारू जप्त केली. ही दारू पांढुरण्यातून (मध्यप्रदेश) चंद्रपूरला नेली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी लोकेश राजेश भैसारे नामक आरोपीला अटक केली.
गुन्हे शाखेचे युनिट पाचचे अधिकारी-कर्मचारी सोमवारी रात्री पारडी भागात गस्त करीत असताना त्यांना एका खबऱ्याने दारू तस्करीची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी उमिया भंडारा मार्गावर भारत पेट्रोल पंपासमोर उभा असलेल्या एका ट्रकची तपासणी केली. ट्रक मध्ये ऑफिसर चॉईस, मेकडॉल नंबर वन या विलायती दारूचे बॉक्स भरून दिसले. ट्रकचालक आरोपी लोकेश भैसारे याला याबाबत विचारणा केली असता त्याने मध्य प्रदेशातील पांढुणा येथून दारूची खेप आणली असून, ती चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथे नेत होतो, अशी माहिती दिली. दारूचे बिल अथवा दारुच्या वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आठ लाख ७८ हजार रुपये किमतीची दारू तसेच २० लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला.
--
पारडीत गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपी लोकेश भैसारे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश भलावी, पोलीस अंमलदार श्रीकांत साबळे, विजय यादव, प्रफुल्ल पारधी आणि गोपाल यादव यांनी ही कामगिरी बजावली.
___