रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूअड्डा
By Admin | Updated: August 4, 2015 03:09 IST2015-08-04T03:09:57+5:302015-08-04T03:09:57+5:30
अजनी येथील सेंट्रल रेल्वेच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये खुलेआम दारू अड्डा चालविला जात आहे. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)

रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूअड्डा
योगेंद्र शंभरकर ल्ल नागपूर
अजनी येथील सेंट्रल रेल्वेच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये खुलेआम दारू अड्डा चालविला जात आहे. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) ठाण्यापासून केवळ काही अंतरावर हा अड्डा सुरू आहे. या कॉलनीतील तरुणांसह परिसरातील धंतोली, मेडिकल चौक, चुना भट्टी आदी परिसरातील ग्राहकही येथे २४ तास दारू खरेदीसाठी येतात. इतके होऊनही अजनी पोलिसांना या अवैध दारू अड्ड्यांची साधी माहिती कशी नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे
यासंबंधात माहिती मिळताच लोकमतची चमू जेव्हा रेल्वे कॉलनीत पोहोचली तेव्हा कॉलनीतील रेल्वे जनमंडल शाळेजवळ खुर्च्यांवर बसून विक्रेता आणि त्याचे नोकर दिवसाढवळ्या दारुड्यांना दारू वितरित करतांना आढळून आले. हा सर्व प्रकार लोकमतने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे येथे नियमित येणाऱ्या ग्राहकांना पहिले पैसे घेऊन सर्रास दारूवितरित केली जाते. परंतु अनोळखी व्यक्तीला मात्र दारू देतांना त्याची चांगलीच विचारपूस केली जाते. खात्री पटल्यावर क्वॉर्टरच्या आतून दारुची बॉटल आणून दिली जाते.
परंतु या अड्ड्याची सारी कार्य पद्धती पुरावा म्हणून कॅमेऱ्यात कैद करण्याची योजना तयार करण्यात आली. स्टिंग आॅपरेशनसाठी लोकमत चमूचा एक सदस्य आपली वेशभूषा बदलवून बोगस ग्राहक बनून या अड्ड्यावर पोहचला. अनोळखी ग्राहक पाहून अड्ड्याचा संचालकाने विचारपूस सुरू केली. यावेळी लोकमत चमूचे इतर सदस्य दूर कॅमेऱ्यासह रेकॉर्डिंग करीत होते. विचारपूस केल्यानंतर विक्रेत्याने ४५ रुपयाची देशी दारूची बॉटल ५५ रुपयात दिली.
स्थानिक लोकांनुसार अड्ड्यासमोरील मोकळ्या जागेवर पाण्याची व्यवस्था असल्याने रात्रीच्या वेळी दारुडे गर्दी करतात. परंतु पोलीस व आरपीएफकडून कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या अड्ड्याचा संचालक निर्धास्त आहे.
दारूअड्ड्यावरच दोन धार्मिक स्थळे
या दारूच्या अड्ड्याच्या उजव्या आणि डाव्या बाजुने दोन मोठे धार्मिक स्थळ आहेत. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार सकाळी-दुपारी, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत दारू अड्डा सुरू राहतो. दारुडे अनेकदा धार्मिक स्थळाजवळ बसून दारू प्यायलाही मागेपुढे पाहत नाही. दारुबंदीच्या दिवशी तर या ठिकाणी सर्रासपणे दारू विकली जाते. दारुड्यांचा दरबार भरतो. यासंबंधात अनेकदा अजनी पोलिसांकडे आणि आरपीएफकडे तक्रार करण्यात आली. परंतु याची माहिती विक्रेत्याला पोहोचते आणि तक्रारकर्त्याला त्यानंतर धमकी मिळते.
दारू विक्रेता रेल्वे कर्मचारी नाही
दरम्यान नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर लोकांनी सांगितले की, येथे दारू अड्डा चालविणारी व्यक्ती रेल्वे कर्मचारी नाही. असे असताना तो येथील सरकारी क्वॉर्टरमध्ये राहून दारू अड्डा चालवित आहे. याशिवाय त्याने शेजारच्या खाली क्वॉर्टरवर अवैध कब्जा केला आहे. त्यापैकी एका क्वॉर्टरमध्ये दारू चे गोडावून तयार केले आहे. तसेच काही क्वॉर्टर किराणा दुकानदारांना माल ठेवण्यासाठी भाड्याने दिले आहेत. शिवाय येथे बाहेरच्या लोकांच्या बेसेस व इतर वाहनेही पार्क केल्या जात आहेत.
कठोर कारवाई करणार
यासंबंधी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी सांगितले की, येथील क्वॉर्टर रेल्वे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांना क्वॉर्टर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिवाय सरकारी कॉलनीत दारू चा अड्डा चालत असेल तर दोषी विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.