नरेश डोंगरे -नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणात संशयीत म्हणून नाहक बदनामीचा पात्र ठरलेला आकाश कनोजिया आज पुन्हा नागपूर मार्गे छत्तीसगडला गेला. मात्र, यावेळी त्याने कसलेही लचांड मागे लागणार नाही, याची पुरती काळजी घेतली. एवढेच काय, त्याने आज रेल्वे पोलीस, पत्रकार अशा सर्वांनाच गुंगारा दिला.
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध घेणाऱ्या मुंबई पोलिसांनी शनिवारी, १८ जानेवारीला रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला मेसेज दिला होता. त्यानुसार, संशयीत आरोपी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने छत्तीसगडकडे जात होता. त्याचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने दुर्ग (छत्तीसगड) आरपीएफच्या पथकाने आकाश कनोजियाला ताब्यात घेतले होते. मोठी कामगिरी केल्याच्या अविर्भावात आरपीएफने आकाशसोबत फोटो सेशन करून वृत्तवाहिन्यांसमोर बाईटही दिले होते. त्यानंतर रातोरात छत्तीसगड, रायपूरला पोहचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात आकाशला देण्यात आले होते. या घटनाक्रमामुळे सैफवर हल्ला करणारा म्हणून निर्दोष आकाशच्या वाट्याला नाहक बदनामी आली होती. पोलिसांच्या चाैकशीचा 'फटका'ही त्याला सहन करावा लागला होता. सुदैवाने खरा हल्लेखोर मोहम्मद शरिफुल रविवारी, १९ जानेवारीला सकाळी पकडला गेल्याने आकाशची पोलिसांच्या ससेमिऱ्यातून सुटका झाली.
नोकरीही गेली अन् छोकरीहीदेशभरातील सर्वच वृत्तवाहिन्यांमध्ये सैफवर हल्ला करणारा म्हणून निर्दोष आकाश कनोजियाचे फोटो, व्हीडीओ आल्याने तो ज्या ठिकाणी वाहनचालक म्हणून कामाला होता, त्याला त्यांनी कामावरून काढून टाकले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आकाशचे लग्न जुळले होते. मुलीकडच्या मंडळींनी हे लग्नही मोडले. अर्थात काहीही दोष नसताना आकाशची नोकरीही गेली अन् छोकरीही गेली. या पार्श्वभूमीवर, आज बिलासपूर,छत्तीसगडमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी आकाश ट्रेन नंबर ०२८०९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेलने नागपूर मार्गे निघाला. त्याची भनक लागताच पत्रकारांनी त्याचा मोबाईल नंबर मिळवून त्याला नागपूर स्थानकावर गाठण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी रेल्वे पोलिसांचीही मदत घेण्याचे प्रयत्न केले.
मात्र, दुधाने तोंड पोळले म्हणून ताकही फुंकून प्यावे, त्याप्रमाणे आकाशने धावत्या गाडीत पत्रकारांशी जुजबी संवाद साधला. नंतर मात्र त्याने आपला फोन बंद करून पत्रकारांसोबत पोलिसांनाही गुंगारा दिला.