अनमोल जैवविविधतेवर नको ‘विकासा’चा आघातलढा पर्यावरण रक्षणासाठी
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे होऊ घातलेल्या अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्पावरून पर्यावरणवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे पर्यावरण विभागाची `एनओसी` न घेता काम पुढे रेटल्याने हा प्रकल्पही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दुसरीकडे प्रकल्पामध्ये हजारो झाडांचा बळी जाणार असल्याने या परिसरातील जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पश्चिम नागपूरमध्ये सिव्हील लाईन्स, सेमिनरी हिल्स व इतर भागामुळे बऱ्यापैकी हिरवळ शिल्लक आहे. मात्र पूर्व व दक्षिण नागपूरच्या क्षेत्रात सर्वत्र सिमेंटचे जंगल व्यापले असताना अजनी रेल्वे कॉलनी परिसराचा हा एकमेव पट्टा हिरवळीने व्यापला आहे आणि हा उरलेला परिसरही सिमेंटने व्यापला जाणार असेल तर अशा विकासाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरटीआयद्वारे इंटर मॉडेल प्रकल्पाची माहिती प्रकाशात आणणारे पर्यावरणप्रेमी ज्येष्ठ नागरिक आशीष घोष यांनी याच भागातील ६०-७० नागरिकांच्या स्वाक्षरीसह महापालिकेच्या उद्यान विभागाला प्रकल्पासाठी वृक्षतोडीला परवानगी देऊ नये म्हणून निवेदन दिले आहे. त्यांनी सांगितले, जुन्या अजनी रेल्वे कॉलनीचा हा परिसर ४५० एकरांमध्ये पसरलेला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७० एकरमध्ये अजनी रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण व बसस्टॅँड ट्रान्सपोर्ट हब उभारणी केली जाणार आहे. या पहिल्याच टप्प्यात १५०० ते २००० झाडे कापली जाणार आहेत. प्रकल्प किंवा विकासकामांना विरोध नाही पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी घेणे योग्य नाही. या परिसरात हजारो वृक्ष कापली गेल्यास त्यावर बागडणारी पक्षी, प्राण्यांची जैवविविधता नष्ट होईल, याची जाणीव ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वड, पिंपळ, सिसम, सागवानाची वृक्षवल्ली
या ४५० एकराच्या परिसरात १००-१५० वर्षे जुने पिंपळ, वड, कडुलिंब, करंज, काटेसावर, सिसम, सागवान आणि सुगंधित पुष्प देणाऱ्या जुईसारखे ३० ते ४० प्रजातींचे वृक्ष आहेत. या वृक्षांवर ३०-४० प्रकारचे पक्षी व प्राण्यांचा अधिवास आहे. या संपूर्ण जैवविविधतेवर प्रकल्पामुळे संकट कोसळणार आहे.
केवळ वृक्षवल्लीच नाही तर कॉलनीत राहणारे नागरिक विस्थापित होतील. परिसरात असलेली रेल्वे मेन्स शाळा तसेच केंद्रीय विद्यालयाची प्राथमिक शाळा जाणार असल्याची माहिती आहे. आसपासच्या वस्त्यातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी रेल्वे मेन्स शाळा मोठा आधार आहे. या शाळांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे पण कुठे, याचे उत्तर नाही.
पुढच्या परिसरावरही सावट
एकीकडे मॉडेल स्टेशनचा प्रकल्प राबविला जात आहे तर दुसरीकडे वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून रेल्वे मेन्सपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पानंतर केंद्रीय विद्यालय तसेच रेल्वे आरक्षण केंद्रासमोरच्या भागावरही विकास कामांचा सपाटा सुरू होणार, अशी चर्चा चालली असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होईल, अशी भीती आहे.
महामार्ग प्राधिकरणाचा रेकॉर्ड खराब आहे. ते विकास कामांसाठी वृक्षतोड करतात पण मोबदल्यात झाडे लावत नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही. हा प्रकल्प चांगला आहे व त्याचा फायदा होईलही पण पर्यावरणाचा बळी घेऊन हाेणारा विकास काय कामाचा? त्यामुळे तेथील जैवविविधतेची जाणीव ठेवून पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची गरज आहे.
- श्रीकांत देशपांडे, पर्यावरण कार्यकर्ते