एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:09 IST2023-05-11T22:08:42+5:302023-05-11T22:09:07+5:30
Nagpur News एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे.

एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून
नागपूर : एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे. नागपुरातून मुंबईकडे दुपारी उड्डाण भरणाऱ्या विमानामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कंपनीचे नागपुरातून मुंबईला जाणारे दुसरे विमान राहणार आहे.
गो-फर्स्ट विमानसेवा बंद झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीने मुंबई-नागपूर-मुंबई विमानाच्या तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविल्यानंतर लोकांची ओरड सुरू आहे. त्यातच एअर इंडियाने मुंबई-नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
एअर इंडियाचे एआय १६१३ हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात दुपारी १२.२० वाजता येणार येईल आणि हेच विमान एआय १६१४ बनून नागपुरातून १२.५५ वाजता उड्डाण भरून मुंबईला २.४५ वाजता पोहोचणार आहे. कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त विमान म्हणून उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरणार आहे. त्यानंतर हे विमान नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपनीच्या तिकिट दरात निश्चितच घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे आधी सुरू असलेले विमान मुंबईहून नागपुरात ८.३५ वाजता येते आणि नागपुरातून ९.२० वाजता मुंबईला उड्डाण भरते. नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी कंपनीने पूर्ण केली आहे.