मेडिकलला लागले वेध ‘एम्स’चे
By Admin | Updated: November 3, 2014 00:38 IST2014-11-03T00:38:55+5:302014-11-03T00:38:55+5:30
मेडिकलच्या टीबी वॉर्ड जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेवरील त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभागाला मेडिकलमध्ये

मेडिकलला लागले वेध ‘एम्स’चे
टीबी वॉर्डातील जागा खाली करून देण्याच्या सूचना
नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या जागेवरील त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभागाला मेडिकलमध्ये उपलब्ध रिकामी जागा पाहण्याच्या सूचना अधिष्ठात्यांनी दिल्याने विभागप्रमुखांची जागेसाठी भटकंती सुरू झाली आहे.
मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या ५५ एकर जागेवर एम्स रुग्णालयाचे बांधकाम होणार आहे. सद्यस्थितीत या जागेवर मेडिकल कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, त्वचारोग विभाग आणि छाती व क्षयरोग विभाग आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला प्राधान्य दिले जात आहे. मेडिकलच्या परिसरात इतरत्र पर्यायी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते का, यावर चर्चा सुरू झाली आहे. मेडिकल परिसरात सध्या अधिष्ठात्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील जागादेखील मोकळी आहे.
याशिवाय अधिकाऱ्यांची अनेक निवासस्थाने पडिक आहेत. कर्मचारी निवासस्थानासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पाठीमागील १८ एकर जागा मोकळी आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तीन मजली निवासस्थान उभे केले जाण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करणे सुरू झाले असून, लवकरच ते मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या नवीन निवासस्थानासाठी अंदाजे २०० कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे.
त्वचारोग विभागाचे वरिष्ठ डॉक्टर शनिवारी मेडिकलमध्ये कुठे रिकामी जागा मिळते का, या शोधात होते. नेत्ररोग विभागाच्या मागील भागात असलेल्या ओटीपीटी इमारतीच्या रिकाम्या दोन मजल्यांवर त्यांची शोधमोहीम तूर्तास ती थांबलेली आहे. येथे हा विभाग हलविता येणे शक्य आहे का, यावर विचारमंथन सुरू आहे. छाती व क्षयरोग विभाग हा तूर्तास सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चौथ्या माळ्यावर रिकाम्या असलेल्या दोन वॉर्डात नेण्याच्या तयारीत आहे. परंतु यात कितपत यश मिळते, यावर शंका व्यक्त केली जात आहे. एकूणच ‘एम्स’ला घेऊन मेडिकल प्रशासन गंभीर आहे. एम्सच्या जागेवरील अडथळे ते स्वत:हून दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)