‘एम्स’च्या जागेची पाहणी आज
By Admin | Updated: February 13, 2015 02:12 IST2015-02-13T02:12:57+5:302015-02-13T02:12:57+5:30
आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एम्स) जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू नागपुरात येणार आहे.

‘एम्स’च्या जागेची पाहणी आज
नागपूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एम्स) जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू नागपुरात येणार आहे. ही चमू उद्या शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्डाची व मिहान परिसरातील जागेची पाहणी करणार आहे.
मंत्रालयाची पाच सदस्यीय चमू शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता निरीक्षण सुरू करेल. त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन अधिकारी, मेडिकलचे व मेयोचे अधिष्ठाता व एमएडीसीच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
केंद्राच्या २२०० कोटी रु पयांचा हा प्रकल्प मेडिकलशेजारी उभा राहणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानुसार टीबी वॉर्डाच्या ४५ एकर जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभाग मिळून असलेल्या १३० एकर जागेवरील सागवानाची झाडे आणि मोकळ्या परिसरात महाविद्यालय तसेच अजनी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या मेडिकल वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
परंतु दरम्यानच्या काळात टीबी वॉर्ड आणि मिहान परिसरातील जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार उद्या या दोन्ही जागा पाहण्यात येतील.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार टीबी वॉर्डाच्या ४५ एकर जागेवर एम्सच्या रुग्णालयाची इमारत तर मिहानच्या परिसरात संशोधन व कॉलेज कॅम्पस राहणार आहे. परंतु याला घेऊन वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले, आतापर्यंत चमूमध्ये कोण-कोण सदस्य असणार याची माहिती नाही. केवळ चंदीगड येथील मेडिकल वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुप्ता यांचा मेल आला आहे, असेही ते म्हणाले. एमएडीसीचे मुख्य अभियंता एस.वी. चहांदे यांनी सांगितले, शुक्रवारी सकाळी १० वाजता केंद्रीय चमू ‘एम्स’साठी मिहानची जागा पाहण्यासाठी येत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)