एआयचा केला जातोय असाही दुरुपयोग, महापुरुषांचे आक्षेपार्ह व्हिडीओ 'व्हायरल'

By योगेश पांडे | Updated: July 5, 2025 19:23 IST2025-07-05T19:22:37+5:302025-07-05T19:23:18+5:30

सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : सायबर सेलचे 'मॉनिटरिंग' कुठे?

AI is being misused, offensive videos of great men go viral | एआयचा केला जातोय असाही दुरुपयोग, महापुरुषांचे आक्षेपार्ह व्हिडीओ 'व्हायरल'

AI is being misused, offensive videos of great men go viral

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आजकाल 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा उपयोग सर्वच क्षेत्रांत वाढला असताना काही समाजकंटकांकडून याचा दुरूपयोग देखील सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 'एआय'च्या माध्यमातून महापुरुषांचे विविध गाण्यांवर नाच करतानाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचादेखील समावेश आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हा सरळसरळ प्रयत्न आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या 'सायबर सेल'कडून आक्षेपार्ह व्हिडीओजवर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, असे व्हिडीओ व्हायरल होत असताना त्यांचे 'मॉनिटरिंग' कुठे गेले असा सवाल उपस्थित होत आहे.


'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार अशा पद्धतीचे व्हिडीओ नागपुरातदेखील 'व्हायरल' होत आहेत. फेसबुकच्या 'अल्गोरिदम'चा वापर करून काही समाजकंटकांकडून याबाबत तयार करण्यात आलेल्या रिल्स व व्हिडीओ फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांवर शेअर करण्यात येत आहे.


'लोकमत'ने याची चाचपणी केली असता यासंदर्भातील एका खातेधारकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत असल्याची बाब समोर आली. 'ठाकूर_रियासत' या नावाने संबंधित व्यक्तीचे खाते आहे. खातेधारक नागपूरच्या बाहेरचे असून, ते नेमके कुठले आहेत याची कल्पना येत नसली तरी नागपुरातील अनेक जणांच्या फेसबुक व इन्स्टा रिल्समध्ये संबंधित खातेधारकाने तयार केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ दिसून येत आहे. 'शजमल ४५५५' तसेच 'डायरेक्ट माईंड फ्रेश५०'या इन्स्टा खातेधारकांकडून महात्मा गांधी यांचा नाच करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.


'एआय'च्या माध्यमातून विकृत रूप

  • 'एआय टूल्स'चा वापर करून महापुरुषांचे अॅनिमेटेड व्हर्जन तयार करण्यात येतात. त्यानंतर महापुरुष एखाद्या रॉक गाणे, लावणी किंवा इतर गाण्यांवर नाचतानाचे स्वरूप दिले जाते. त्यात नाचाचे 'स्टेप्स' हे अश्लाघ्य व आक्षेपार्ह पद्धतीचे बनविण्यात येतात.
  • महात्मा गांधी यांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच एका तरुणीसोबत नाचतानाचा बनविण्यात आला आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर व्हिडीओ तर कुटुंबियांसोबत बसून ऐकता येणार नाहीत अशा गाण्यांवर तयार करण्यात आला आहे.
  • एका व्हिडीओत चक्क एक विकृत व्यक्ती बाबासाहेबांना 'हॉलिवूड स्टाईल'ने मारत असल्याचेदेखील दाखविण्यात आले आहे. असे व्हिडीओ बनवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचाच प्रयत्न दिसून येत आहे.


पोलिसांचा दावा, तक्रार झाल्यास कारवाई
यासंदर्भात सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांना संपर्क केला असता अशा व्हिडीओजबाबत एकही तक्रार आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तक्रार आल्यावर किंवा आमच्या पथकाला असा आक्षेपार्ह व्हिडीओ आढळला तर संबंधितांवर लगेच कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: AI is being misused, offensive videos of great men go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.