AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
By आनंद डेकाटे | Updated: December 22, 2025 19:38 IST2025-12-22T19:37:07+5:302025-12-22T19:38:03+5:30
IIM नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन

AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे कार्यक्षमता, गती आणि निर्णयक्षमता निश्चितच वाढू शकते; मात्र एआय कधीही मानवाची शिकण्याची प्रक्रिया, विवेक, नैतिकता आणि जबाबदारी यांची जागा घेऊ शकत नाही, या मतावर सोसायटी ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (सोम) च्या २८ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्व तज्ज्ञांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. ही परिषद भारतीय प्रबंध संस्थान (आय. आय. एम.) नागपूर येथे पार पडली. परिषदेत शिक्षण क्षेत्रातील संशोधन तसेच भारतीय रेल्वेसारख्या सार्वजनिक व्यवस्थांमध्ये एआयचा जबाबदारीने कसा वापर करता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली.
देश-विदेशातील वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, उद्योगजगताचे प्रतिनिधी आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी झाले होते. ज्ञाननिर्मिती आणि सार्वजनिक प्रणालींमध्ये एआयचा समतोल आणि नैतिक वापर कसा करावा, यावर विचारमंथन करण्यात आले. परिषदेतील मुख्य आकर्षण ठरलेले ‘डायरेक्टर्स पॅनल’ आय. आय. एम. नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. या सत्रात संशोधन आणि शैक्षणिक प्रकाशनांवर एआयचा होणारा परिणाम चर्चिला गेला. आय. आय. एम. मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी हे व्हर्च्युअली सहभागी झाले, तर एस. पी. जे.आय. एम. आर. मुंबईचे अधिष्ठाता डॉ. वरुण नागराज, आय. आय. एम. इंदूरचे माजी संचालक प्रा. एन. रविचंद्रन तसेच टोयोटा इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक प्रा. टी. आर. परशुरामन यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
पॅनल सदस्यांनी सांगितले की माहिती शोधणे, संदर्भ गोळा करणे आणि लिखित मजकूर मांडणे यांसारख्या कामांमध्ये एआय उपयुक्त ठरू शकतो; मात्र शिकणे आणि विचार करण्याची मूलभूत प्रक्रिया दुर्लक्षित करता येणार नाही. डॉ. वरुण नागराज यांनी नमूद केले की संशोधनाची सुरुवात शिकण्यापासून होते आणि एआयवर अतिविश्वास, विशेषतः तरुण संशोधकांची निर्णयक्षमता कमी करू शकतो. प्रा. मनोज कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले की एआयमुळे वेग आणि कार्यक्षमता वाढू शकते, पण संशोधनातील मानवी जवाबदारीला कोणताही पर्याय नाही.
प्रा. एन. रविचंद्रन म्हणाले की, गहन वाचनामुळे विषयाची अधिक चांगली समज विकसित होते. प्रा. टी. आर. परशुरामन यांनी उद्योग क्षेत्र एआयचा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचे नमूद करत, संशोधकांनी एआयचा पर्याय म्हणून नव्हे तर शक्तिशाली सहाय्यक म्हणून वापर करावा. परिषदेच्या औपचारिक उद्घाटन सत्रात आयआयएम नागपूरचे संचालक प्रा. भीमराया मेत्री, सोम चे अध्यक्ष प्रा. राहुल मराठे तसेच ओएनजीसी ग्रीनचे मुख्य परिचालन अधिकारी डॉ. हर्ष नुपुर जोशी यांनी आपले विचार मांडले. प्रा. आलोक कुमार सिंह, अधिष्ठाता– एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन प्रोग्राम्स, यांनी प्रस्तावना केली, तर प्रा. निकुंज कुमार जैन, चेअरपर्सन, एक्झिक्युटिव्ह एमबीए इन एनर्जी मॅनेजमेंट, यांनी आभार प्रदर्शन केले. ओएनजीसी लिमिटेडचे संचालक (रणनीती व कॉर्पोरेट व्यवहार) अरुणांशु सरकार यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आपले विचार व्यक्त केले.
चालकविरहित गाड्या चालवण्याची कोणतीही योजना सध्या नाही!
रेल्वे प्रवास अधिक सुलभ व्हावा, योग्य वेळी योग्य मदत मिळावी यासाठी एआयची भूमिका महत्त्वाची असली, तरी चालकविरहित गाड्या चालवण्याची कोणतीही योजना सध्या नाही, असे भारतीय रेल्वेवर केंद्रित स्वतंत्र परिसंवादात वक्त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अजिंक्य टांकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, क्रिसचे महाव्यवस्थापक (इंडस्ट्रियल कम्प्युटिंग) डॉ. ज्ञानेश त्रिपाठी तसेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे संचालक राहुल पाचोरी सहभागी झाले. वक्त्यांनी स्पष्ट केले की क्रू व्यवस्थापन, आरक्षण प्रणाली आणि संचालन नियोजन यांसारख्या क्षेत्रांत एआय उपयुक्त ठरू शकतो; मात्र निकट भविष्यात लोको पायलटांच्या जागी एआय येणार नाही.