कृषी विभागाचे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’!

By Admin | Updated: July 6, 2015 03:01 IST2015-07-06T03:01:47+5:302015-07-06T03:01:47+5:30

आतापर्यंत केवळ शेतीविषयक शासकीय योजना राबविणाऱ्या कृषी विभागाने आता मात्र ‘अ‍ॅग्रो टुरिझम’कडे वाटचाल सुरू केली आहे.

Agriculture Department's 'Agro Tourism'! | कृषी विभागाचे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’!

कृषी विभागाचे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’!

हालचाली सुरू : ‘कदिमबाग’ होणार पर्यटनस्थळ
जीवन रामावत नागपूर
आतापर्यंत केवळ शेतीविषयक शासकीय योजना राबविणाऱ्या कृषी विभागाने आता मात्र ‘अ‍ॅग्रो टुरिझम’कडे वाटचाल सुरू केली आहे. यासाठी नागपूर कृषी विभागाने सिव्हिल लाईन्स परिसरातील कदिमबाग नर्सरीची निवड केली आहे. येथे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ विकसित करण्याचा विचार केला जात आहे. यातून नागपूरकरांना आता शहराच्या मध्यभागी ‘कृषी पर्यटनाचा’ आनंद लुटता येणार आहे.
कृषी विभागाने सिव्हिल लाईन्ससारख्या प्रशस्त परिसरात ‘कदिमबाग’ नर्सरी विकसित केली आहे. त्यामुळे येथील ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ सर्वांसाठी सोयीचे ठरणार आहे. या नर्सरीत आंबा, चिकू, पेरू , आवळा, लिंबू, सीताफळ, चिंच, बोर, संत्रा व मोसंबीच्या बागेसह आधुनिक शेती विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे येथे वर्षभर हिरवेगार निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळते. तसेच कृषी विभागाने येथे सिमेंटचा पक्का रस्ता तयार करू न त्यावर स्ट्रिट लाईट लावले आहेत.
त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. शिवाय या बागेत एक शितला माता मंदिर असून, तेथे रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथील पर्यटनाला धार्मिक जोड सुद्धा मिळणार आहे. कृषी विभागाने येथील संपूर्ण परिसराला सुरभा भिंत बांधली आहे. तसेच लवकरच येथे एक भव्य प्रवेशव्दार सुद्धा तयार केले जाणार आहे. अलिकडे पर्यटकांचा कृषी पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. परंतु विदर्भात अजूनपर्यंत ‘कृषी पर्यटन’ फारसे विकसित झालेले नाही. उलट पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ‘कृषी पर्यटन’ विकसित करू न, उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. विदर्भात मात्र तसा कुठेही प्रयोग झालेला दिसून येत नाही. कृषी विभागाने सुद्धा येथील शेतकऱ्यांना त्यासाठी कधीच प्रोत्साहित केलेले नाही.
मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयातील फलोत्पादन संचालक अतुल पाटणे यांनी अलिकडेच ‘कदिमबाग’ येथे दिलेल्या भेटीदरम्यान येथे ‘अ‍ॅग्री टुरिझम’ विकसित करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार कृषी विभागाने या हालचाली सुद्धा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, यातून कृषी विभागाला आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्रोत मिळणार आहे.
‘चिकू’ नेपाळला
कृषी विभागाने येथील बागेत आंबा, चिकू, आवळा, पेरु, संत्रा, मोसंबी, लिंबू, सीताफळ, चिंच व बोरासह विविध झाडांच्या कलमांसाठी ८९५ पेक्षा अधिक मातृवृक्ष तयार केले आहेत. यापासून दरवर्षी सुमारे २४ ते २५ हजार कलमांची विक्री केल्या जात आहे. शिवाय यंदा येथील चिकूच्या कलमा थेट नेपाळपर्यंत पोहोचल्याची माहिती येथील कृषी अधिकाऱ्यांनी दिली. या बागेत लंगडा, दशेरी, केशर, रत्ना, तोतापुरी, मल्लिका व आम्रपाली जातीच्या आंब्यासह कालीपत्ती व क्रिकेटबॉल चिकू, एन ए-४/७/१०, आनंद-१ व चकैया आवळा, लखनौ -४९ व ललित पेरु, काटोल गोल्ट मोसंबी, बालानगर सीताफळ व प्रतिष्ठान चिंचीच्या झाडांसह उमरान, कडाका, कालागोला आणि सफरचंद जातीच्या बोरांची झाडे येथे पाहायला मिळतात. याशिवाय येथे गांडूळ खताचा प्रकल्प व पॉलिहाऊ समध्ये ‘जरबेरा’ची फुलशेती केली जात आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, सध्या येथील नर्सरी, फुलशेती व गांडुळ खताच्या प्रकल्पांपासून वर्षाला सुमारे साडेसहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.
पर्यटनाला वाव
कृषी पर्यटनासाठी येथे सर्व गोष्टी अनुकूल आहेत. काहीच दिवसांपूर्वी येथे सिमेंट रस्ता बांधण्यात आला असून, त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. शिवाय येथील संपूर्ण शेती आधुनिक पद्धतीने विकसित केली आहे. त्यामुळे येथे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ला फार मोठा वाव आहे. परंतु यासोबतच येथे कर्मचाऱ्यांचा फार मोठा अभाव आहे. मागील दोन वर्षांत या नर्सरीचा संपूर्ण कायापालट केला आहे. परंतु त्या परिश्रमाच्या मोबदल्यात मला शाबासकी ऐवजी बदलीचे बक्षीस मिळाले आहे.
अनिल महंत
कृषी पर्यवेक्षक, कदिमबाग

Web Title: Agriculture Department's 'Agro Tourism'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.