कृषी विकास दर १० टक्क्यांवर जाणार
By Admin | Updated: November 12, 2016 03:16 IST2016-11-12T03:16:52+5:302016-11-12T03:16:52+5:30
राज्यात कृषीचा विकास दर उणे १६ टक्क्यांवर होता. शेतीची पिछेहाट रोखण्यासाठी शासन गेल्या दोन वर्षांपासून विविध योजना आणि प्रयोग राबवित आहे.

कृषी विकास दर १० टक्क्यांवर जाणार
देवेंद्र फडणवीस यांची माहिती : अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : राज्यात कृषीचा विकास दर उणे १६ टक्क्यांवर होता. शेतीची पिछेहाट रोखण्यासाठी शासन गेल्या दोन वर्षांपासून विविध योजना आणि प्रयोग राबवित आहे. यंदा रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले असून पावसाने साथ दिली तर उत्पादनात वाढ होऊन कृषीचा विकास दर ८ ते १० टक्क्यांपर्यंत जाण्याची आशा असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
‘अॅग्रोव्हिजन’ हे चार दिवसीय राष्ट्रीय कृषी प्रदर्शन रेशीमबाग मैदानावर शुक्रवारपासून सुरू झाले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. या समारंभात हरियाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनकर, आसामचे कृषिमंत्री अतुल बोरा, महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन, दुग्ध वस्त्रोद्योग मंत्री महादेव जानकर, खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, आयटीसी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पुरी, महिन्द्र राईजचे (फॉर्म विभाग) मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश चव्हाण, गिरीश गांधी मंचावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उत्पादकता वाढविण्याची गरज
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कृषी उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. कमी उत्पादकतेमुळे शेतकऱ्यांना हमीभाव परवडत नाही. कापूस आमच्यापेक्षा राजस्थानात दुप्पट होतो. त्याच कारणामुळे हमीभाव चार हजार रुपये असला तरीही तो शेतकऱ्यांना परवडत नाही. ५० हजार एकर जमीन सेंद्रीय पिकाखाली आणण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी उत्तम वाणाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नितीन गडकरी
यांचे स्वप्न पूर्ण होणार
विदर्भात दुप्पट दूध उत्पादनाचे नितीन गडकरी यांचे स्वप्न तीन वर्षांत पूर्ण होईल. आर्यशक्ती नावाने सरकारचा ब्रॅण्ड आला आहे. विविध तरतुदींमुळे पाच वर्षांत परिवर्तन दिसून येईल, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
शेती हा ज्ञानाचा उद्योग
झिरो बजेट शेतीचा प्रकल्प काहींनी आणला आहे. त्यात खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे. मुख्यमंत्री म्हणाले, शेती ज्ञानाचा उद्योग आहे हे समजावून घ्यावे लागेल. नवीन प्रयोगाने शेतीचे क्षेत्र वाढणार आहे. ११ जिल्ह्यात कापसाचे उत्पादन होत असल्याने अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमध्ये १२ कंपन्या सुरू झाल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्यात लाखाहून जास्त वीज पंपासाठी वीज दिली आहे. सौर ऊर्जेसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळणार आहे. एक लाख विहिरी, एक लाख शेततळे आणि जलयुक्त शिवारामुळे पाण्याची पातळी वाढणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वीच्या सरकारने ठिबक सिंचन योजनेचा दुरुपयोग केला. शेतकऱ्यांना ७५० कोटी दिलेच नाही. आता नवीन योजनेत उसाचे क्षेत्र वाढणार आहे. योजनेत ५० टक्के राज्य सरकार, २५ टक्के कारखाना आणि २५ टक्के शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम भरायची आहे.
प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार- गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि उत्पादन वाढीसाठी नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन आठ वर्षांपासून करण्यात येत आहे. अॅग्रोव्हिजनचे व्यासपीठ शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी सुरू करण्यात येणार आहे. जलयुक्तशिवार आणि कृषी पंपांना वीजपुरवठा याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्कृष्ट काम केले आहे. ठिंबक सिंचनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. तसेच गुजरातच्या धर्तीवर विदर्भ व मराठवाड्यातही धवलक्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे यासाठी एनडीटीबी सहकार्य करणार आहे. या प्रदर्शनासाठी दुबई व कतार येथील प्रतिनिधी उपस्थित असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
स्मरणिकेचे उद्घाटन
प्रारंभी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संयोजक गिरीश गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तर रवी बोरटकर यांनी प्रास्ताविकात आठव्या अॅग्रोव्हिजनची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनातील विविध दालनांची पाहणी केली. तसेच यावेळी विशेष तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे विमोचन केले. आभार प्रदर्शन आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर यांनी केले. संचालन रेणुका मानकर यांनी केले. कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी तीन दिवस मोफत ३० कार्यशाळा होणार आहे. या समारंभात आमदार डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, विकास कुंभारे, सुलेखा कुंभारे, वेदचे अध्यक्ष देवेन पारेख, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण, केंद्रीय कृषी विभागाचे माजी सचिव नंदकुमार आणि मोठ्या संख्येने शेतकरी, लोकप्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.