Aggressive position of the RSS against the 'Chinese dragon' | ‘चिनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवाराचा आक्रमक पवित्रा
‘चिनी ड्रॅगन’विरोधात संघ परिवाराचा आक्रमक पवित्रा

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये चीननेदेखील पाकिस्तानचीच री ओढली. भारतातील अंतर्गत मुद्यांमध्ये चीनकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न होत असताना संघ परिवाराने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात ‘चायनीज’ वस्तूंविरोधात मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. आता सणासुदीच्या तोंडावर ‘चायनिज’ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे चीनला आर्थिक दणका देण्यासाठी स्वदेशी जागरण मंचातर्फे देशपातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहसंयोजक डॉ.अश्वनी महाजन यांनी दिली.
स्वदेशी जागरण मंचतर्फे या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. ‘चायनीज’ वस्तूंचा वापर नागरिकांनी शक्य तितका थांबवावा, यासाठी स्थानिक पातळीपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ‘सोशल मीडिया‘चीदेखील मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘डोकलाम’च्या वेळी झाला होता प्रयोग
२०१७ साली डोकलामच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर संघ परिवाराने चीनला आर्थिक दणका देण्यासाठी पावले उचलण्याचा संकल्प केला व याअंतर्गतच ‘चायनिज’ वस्तूंविरोधात देशपातळीवर मोहीम राबविण्यात आली होती. त्या मोहिमेला जनमानसातून समर्थन मिळाले होते.


Web Title: Aggressive position of the RSS against the 'Chinese dragon'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.