भामेवाड्यात अग्गंबाई सासूबाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:39+5:302021-01-13T04:20:39+5:30
सुदाम राखडे कामठी: ‘अग्गंबाई सासूबाई...’ या मालिकेतील सासू आसावरी आणि सून शुभ्रा यांच्यातील घट्ट नात्याची ओळख साऱ्याच गृहिणींना ...

भामेवाड्यात अग्गंबाई सासूबाई...
सुदाम राखडे
कामठी: ‘अग्गंबाई सासूबाई...’ या मालिकेतील सासू आसावरी आणि सून शुभ्रा यांच्यातील घट्ट नात्याची ओळख साऱ्याच गृहिणींना आहे. बबड्याला (सोहम) वठणीवर आणण्यासाठी शुभ्राकडून करण्यात येणारे प्रयोग वास्तवात किती उपयोगात पडतील, हे माहीत नाही. मात्र भामेवाडा ग्रा.पं.च्या विकासाचा संकल्प घेत सासू आणि सून निवडणुकीसाठी उतरले आहेत. याच गावात मामी-भाचामधील लढतही सध्या तालुक्यात चर्चेत विषय ठरत आहे.
कामठी तालुक्यातील भामेवाडा ग्रा.पं.च्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये भाजप समर्थित युवा क्रांती परिवर्तन आघाडीच्या कविता फुकट यांना त्याचे भाचे काँग्रेस समर्थित संघर्ष महाविकास आघाडीचे शुभम बांगडे यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे येथे १५ जानेवारीला मतदार कुणाला कौल देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भामेवाडा ग्रा.पं.च्या ७ जागांसाठी तीन वॉर्डात निवडणूक होत आहे. येथे काँग्रेस समर्थित कविता सुरेश बांगडे या संघर्ष महाविकास आघाडीकडून रिंगणात आहे. बांगडे या गेल्या टर्ममध्ये सरपंच होत्या. त्यांच्या विरोधात युवा क्रांती परिवर्तन आघाडीच्या सपना फुकट मैदानात आहेत. याच वॉर्डात सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असलेल्या जागेसाठी संघर्ष महाविकास आघाडीकडून वैशाली रामटेके यांच्या विरोधात अलका उरे या रिंगणात आहेत. याच वॉर्डातून अनुसुचित जाती करिता राखीव असलेल्या जागेकरिता संघर्ष महाविकास आघाडीकडून अशिष उके तर युवा क्रांती परिवर्तन आघाडीकडून रतन उके यांच्यात लढत होताना दिसत आहे.
वॉर्ड क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण जागेकरिता संघर्ष महाविकास आघाडीकडून माजी उपसरपंच अर्जुन राऊत यांच्या विरोधात युवा क्रांती परिवर्तन आघाडीकडून दिलीप केळेकार रिंगणात आहेत. याच वाॅर्डातून इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव असलेल्या जागेसाठी युवा क्रांती परिवर्तन आघाडीच्यावतीने कविता गायधने रिंगणात आहेत. त्यांचे विरोधात संघर्ष महाविकास आघाडीकडून सविता राऊत यांना संधी देण्यात आली आहे.
वाॅर्ड क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण महिलाकरिता राखीव असलेल्या जागेसाठी संघर्ष महाविकास आघाडीकडून माजी सरपंच कविता बागडे यांची सुन शिल्पा बांगडे रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात युवा क्रांती परिवर्तन आघाडीने प्रतीक्षा भोयर यांना संधी दिली आहे. या ग्रा.पं.वर गत २५ वर्चापासून काँग्रेस समर्थित गटाचे वर्चस्व राहिले आहे. येथे यावेळी युवा क्रांती परिवर्तन आघाडीने परिवर्तनाचा नारा दिला आहे.
एकूण वॉर्ड : ३
एकूण सदस्य : ७
एकूण उमेदवार : १४
एकूण मतदार : ९६०
पुरुष मतदार : ५०७
महिला मतदार : ४५३