लायसन्ससाठी एजंट देतो परीक्षा, अर्जदार होतो पास, तिघांविरूद्ध तक्रार
By सुमेध वाघमार | Updated: July 31, 2025 20:41 IST2025-07-31T20:40:59+5:302025-07-31T20:41:56+5:30
आरटीओची कारवाई : लर्निंग लायसन्स रद्द

Agent gives exam for license, applicant passes, complaint against three
नागपूर : नागरिकांच्या सोयीसाठी आरटीओने सुरू केलेल्या 'फेसलेस' सेवेचा गैरवापर करून, काही एजंट्सनी लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षेची वेबसाईट हॅक केल्याचे उघड झाले आहे. नागपूर शहर आरटीओने कारवाई करत तीन व्यक्तींविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तसेच त्यांचे लर्निंग लायसन्स रद्द केले आहेत. विशेष म्हणजे, ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते.
परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करून आणि आॅनलाइन चाचणी देऊन उत्तीर्ण होणाºया उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे लर्निंग लायसन्स दिले जाते. ही सेवा आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपीच्या माध्यमातून कार्यान्वित केली जाते. मात्र, काही दलाल या सुविधेचा गैरवापर करतात. ते आधार क्रमांकाचा वापर करून स्वत:च्या आणि अर्जदाराच्या नावाने दोन आॅनलाइन अर्ज करत. 'फेस आॅथेंटिकेशन' दरम्यान, हे एजंट्स कमांड पोर्टमध्ये जाऊन वेबसाईट कोडिंगमध्ये बदल करत होते, ज्यामुळे अर्जदाराऐवजी इतर कोणाचाही चेहरा प्रमाणित होता, त्यानंतर, वेबकॅमेºयावर बोट ठेवून एजंट स्वत:च परीक्षा देत लर्निंग लायसन्स मिळवत असत. हा 'साईट हॅक' करण्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, मात्र परिवहन विभागाने याकडे गांभीयार्ने पाहिले नव्हते. आता शहर आरटीओने तीन व्यक्तींविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केल्याने परिवहन विभाग यात काय सुधारणा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असे पकडले तिघांना
शहर आरटीओचे सहायक मोटार वाहन निरीक्षक ध्वज दखणे यांनी संगणकीय प्रणालीवर 'फेसलेस' पद्धतीने लर्निंग लायसन्स काढलेल्या काही उमेदवारांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पडताळणी केली. यात असे आढळून आले की, या उमेदवारांनी स्वत: परीक्षा न देता त्यांच्या भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी बाहेरील व्यक्तीस देऊन लायसन्स प्राप्त केले होते. 'ई-केवायसी फेसलेस' प्रणालीचा गैरवापर करून, कायद्याचे उल्लंघन करून आणि शासनाची फसवणूक करून लर्निंग लायसन्स प्राप्त केल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
बोगस लायसन्स काढल्यास पोलीसात तक्रार
"आॅनलाईन फेसलेस प्रणालीचा गैरवापर करुन चाचणी न देता लर्निंग लायसन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न करु नये. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. तसेच अशा प्रकारे लायसन्स काढल्याचे निदर्शनास आल्यास ते लायसन्स रद्द करण्यात येईल व संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल."
-किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर)