डेकाटे टोळीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:48+5:302021-02-14T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चोऱ्या-लुटमाऱ्या करून गब्बर झालेला आणि नंतर अनेकांच्या मालमत्ता बळकावत सुटलेला कुख्यात गुन्हेगार राकेश डेकाटे ...

डेकाटे टोळीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चोऱ्या-लुटमाऱ्या करून गब्बर झालेला आणि नंतर अनेकांच्या मालमत्ता बळकावत सुटलेला कुख्यात गुन्हेगार राकेश डेकाटे तसेच त्याच्या साथीदारांविरुद्ध पुन्हा एका पीडिताने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. सिकंदरसिंग चंदनसिंग संधू (वय ४०) असे तक्रारदाराचे नाव असून ते शास्त्री ले-आऊटमध्ये राहतात. संधू यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपी राकेश डेकाटेकडून २ जानेवारी २०१० ला १० लाख रुपये व्याजाने घेतले होते. ठरलेल्या मुदतीत संधू यांनी डेकाटेला १४ लाख ९१ हजार रुपये परत केले. मात्र, अनाकलनीय पद्धतीने व्याज लावून राकेश, त्याचा भाऊ मुकेश डेकाटे आणि अन्य दोन साथीदारांनी त्यांना छत्रपती चाैकाजवळच्या पेट्रोल पंपावर बोलविले. संधू तेथे त्यांच्या कारने येताच आरोपी जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसले. त्यांना निर्जन ठिकाणी नेले आणि तेथे पुन्हा दोन साथीदारांना बोलावून संधू यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. व्याजाच्या पैशाची मागणी करून आरोपींनी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपवर तसेच टीटीओ फाॅर्मवर सह्या तसेच अंगठे घेतले. त्याआधारे संधू यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचे बनावट विक्रीपत्र तयार करून ते कोर्टात सादर केले. अशाप्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू भक्कम झाल्याचा गैरसमज करून घेत आरोपी राकेश डेकाटे संधू यांच्या घरासमोर यायचा. त्यांना ५० लाख रुपयाची मागणी करायचा आणि ते दिले नाही तर तुझ्यासोबत तुझ्या परिवारालाही जीवे ठार मारू, अशी धमकी द्यायचा. राकेश डेकाटे आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे संधू यांनी तब्बल १० वर्षे आर्थिक नुकसान तसेच शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला. आता मात्र गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्यामुळे संधू यांना हिंमत आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रतापनगर ठाण्यात आरोपी राकेश, मुकेश डेकाटे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.
---
डेकाटेची डावबाजी
अत्यंत धूर्त आणि चालबाज असलेला राकेश डेकाटे हा गुन्हेगार कोणत्याही थराला जातो. दाणीच्या प्रकरणात पोलिसांनी आक्रमकता दाखविल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्धच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. अशाप्रकारे पोलिसांवर दडपण आणून आपल्या पापाला झाकण्याचा डेकाटेचा डाव होता. मात्र, पोलिसांनी तो धुडकावून लावत त्याच्या पापाचा घडा फोडला.
---