नागपूर : एक ऑगस्टपासून माेठा खंड घेतल्यानंतर बुधवारी श्रावणसरींचे जाेरदार पुनरागमन झाले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना चिंब भिजवतानाच यावेळी पश्चिम विदर्भातही धुवांधार हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ११० मि.मी. पावसाची नाेंद झाली, तर जुलैअखेर पर्यंत सरासरीपेक्षा बरेच मागे असलेल्या अमरावती व अकाेला जिल्ह्यालाही यावेळी दमदार पावसाने सुखावले.
जुलै महिन्यात दमदार बरसल्यामुळे विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या पुढे झेप घेतली हाेती. नागपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यात २० ते ३० टक्के अधिक पावसाची नाेंद झाली हाेती. श्रावणाच्या आगमनाच्या दरम्यानही या जिल्ह्यांत पावसाचे धुमशान चालले हाेते. ऑगस्ट सुरू झाल्यापासून मात्र आकाशातून ढगांची गर्दी हटली. दहा-बारा दिवसाचा खंड पडल्यामुळे पावसाचे आकडे सरासरीच्या खाली आले. दुसरीकडे पश्चिम विदर्भात श्रावण सुरू झाल्यापासूनच पाऊस थांबला हाेता. अमरावती व अकाेल्यात सरासरीपेक्षा ३० ते ३० टक्के कमी पाऊस झाला हाेता. यवतमाळ, वाशिम, बुलढाणासुद्धा पिछाडले हाेते. त्यामुळे या भागात नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.
हवामान विभागाने १२ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरला. मंगळवारी किरकाेळ हजेरी लावल्यानंतर बुधवारी पावसाची तीव्रता चांगलीच वाढली. अमरावतीत सकाळी ८.३० पासून १२ तासात ९६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळलाही पावसाने धुवांधार बॅटिंग करीत ७२ मि.मी. नाेंद केली. अकाेल्यात संथगती सरी दिवसभर हाेत्या व १८ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. वर्धा जिल्ह्यात पहाटेपासून चांगलेच झाेडपले. येथे २४ तासात १२७.२ मि.मी. पाऊस झाला.
पश्चिम विदर्भात पावसाने जाेरदार पुनरागमन केले. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा तडाखा सुरू झाला, जाे दिवसाही तीव्र हाेता. येथे सकाळी ८.३० पर्यंत ८६ मि.मी., तर सायंकाळी ५.३० पर्यंत ५३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडाऱ्यात दिवसभर जाेरदार सरी बरसल्या व ४३ मि.मी.ची नाेंद झाली. गडचिराेलीत रात्री बरसल्यानंतर दिवसभर ढग शांत राहिले. याशिवाय गाेंदियात २६ मि.मी., तर नागपूरला १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमी झालेली सरासरी आता सामान्य झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.