लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नव्याने ७९,९८२ मतदारांची भर पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १४,६७१ मतदारांची वाढ झाली असून, त्यानंतर हिंगणा (११,४६९), कामठी (११,०८९) आणि पूर्व नागपूर (१०,२९८) या मतदारसंघातही मोठी भर पडली आहे. विशेष म्हणजे, उमरेडमध्ये केवळ ३३९ मतदार वाढले असून, २०४ मतदारांची घटसुध्दा नोंदवली गेली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी नागपूर येथे घेतलेल्या बैठकीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदारयादी ग्राह्वा धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यानुसार प्रशासनाने निवडणूक तयारीला गती दिली आहे. नागपूरमध्ये मतदारसंख्येतील वाढ ही फक्त आकडेवारीची बाब नसून, ती राजकीय दिशेचा संकेत देणारी आहे. महिला आणि तरुण मतदारांची वाढ, तसेच मतदारसंख्येतील विभागनिहाय तफावत ही आगामी निवडणुकांतील महत्त्वाची ठरणार आहे.
लक्षवेधी बाबी
- २७ ऑक्टोबर २०२४ रोजी एकूण मतदार : ४५,१७,३६१
- १ जुलै २०२५ पर्यंत एकूण मतदारः ४५,९७,३४३
- २ महिन्यांत ७९,९८२ मतदारांची वाढ
- वाढलेल्या मतदारांमध्ये ४६,४३६ महिला, तर ३३,५३१ पुरुष मतदार
- १५ नवीन तृतीयपंथीय मतदारांची नोंद
- उमरेडमध्ये एकूण २०४ मतदारांची नोंदणी रद्द