After a five-day stay, 'Jai Jagat: 2020' leaves for Sevagram | पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना 
पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना 

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींना दिला प्रेमाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच दिवसांच्या नागपूर मुक्कामानंतर जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी निघालेली ‘जय जगत : २०२०’ पदयात्रा सोमवारी सेवाग्रामकडे रवाना झाली. मंगळवारी सायंकाळी ती बुटीबोरीला पोहचत असून मुक्कामानंतर आसोलामार्गे पुढील प्रवासासाठी रवाना होत आहे.
नागपूरहून निघताना पदयात्रेला शालेय विद्यार्थ्यांनी पुढील प्रवासासाठी निरोप दिला. डोंगरगाव येथे पोहचल्यावर मेघे साई आयटीआयमध्ये या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी असलेले सर्वधर्मसमभावाचे मंदिर पाहून पदयात्रेतील प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींचे पुष्पहाराने आणि तिलक लावून मराठमोळ्या वेशात स्वागत केले. यावेळी राजगोपाल पी. व्ही. यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
राजघाट दिल्ली येथून २ ऑक्टोबरला ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत राजगोपाल पी. व्ही. यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत कॅनडा, केनिया, स्पेन, फ्रान्स, मेक्सिको, अर्जेंटिना, इटली यासह १२ देशातील प्रतिनिधी पायदळ चालत आहेत. विदेशातील १५ व भारतातील ३५ अशा ५० प्रतिनिधींचा यात सहभाग आहे.
१५ जानेवारीला सायंकाळी ही पदयात्रा नागपूरला पोहचली होती. या पाच दिवसांच्या मुक्कामात या प्रतिनिधींनी दीक्षाभूमीला भेट दिली. यासोबतच शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला होता.
पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप ३० जानेवारीला सेवाग्राम येथे होत आहे. दुसरा टप्पा २७ सप्टेंबरला सुरू होऊन २ ऑक्टोबरला जिनेव्हा येथे समारोप होईल.

Web Title: After a five-day stay, 'Jai Jagat: 2020' leaves for Sevagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.